@maharashtracity
मुंबई: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदीच्या प्रस्तावात भ्रष्टाचार झाला असून टॅब खरेदी (corruption in Tab procurement) प्रक्रियेबाबत शिक्षण समिती सदस्यांना अंधारात ठेवण्यात आले आहे, असा गंभीर आरोप शिक्षण समितीवरील भाजपचे सदस्य प्रतीक करपे (BJP corporator Pratik Karpe) यांनी केला आहे.
तसेच, या टॅब खरेदी प्रकरणाची सखोल माहिती शिक्षण समिती सदस्यांना द्यावी, अशी मागणी शिक्षण समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयाद्वारे त्यांनी केली.
मुंबई महापालिकेने (BMC) पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पूर्वी पुरवठा केलेल्या टॅबच्या किमतीपेक्षा जास्त खर्च करूनही शैक्षणिक वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना टॅब दिले जाणार आहेत. त्यामागे सत्ताधाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप भाजपाच्या नगरसेविका सुरेखा पाटील (BJP Corporator Surekha Patil) यांनी केला आहे.
प्रत्येक टॅबसाठी अंदाजित रक्कम २० हजार रुपये असून टॅबचा दर्जा, किंमत, कंपनी याबाबतची कोणतीही माहिती समिती सदस्यांना देण्यात आलेली नाही. २०१५ मध्ये खरेदी केलेल्य टॅबमध्ये चार्जिंग न होणे, टॅब हँग होणे, शैक्षणिक ॲप न उघडणे आदी विविध प्रकारच्या अनेक समस्या आढळून आल्या होत्या.
असे असताना नवीन टॅब खरेदी प्रसंगी या समस्यांचा विचार करण्यात आलेला नाही. टॅबमध्ये शैक्षणिक ॲप्लिकेशनसाठी प्रति टॅब २ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत तर वाढीव वॉरंटीसाठी प्रति टॅब ४ हजार ४०० रुपये खर्च येणार आहे. तर टॅबमध्ये स्वतंत्र मेमरीही नाही. या सर्व त्रुटी लक्षात घेता केवळ मर्जीतील कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हा घाट घातला जात आहे का? असा सवाल करपे यांनी यावेळी विचारला.
स्थायी समितीकडून अगोदरच मंजुरी
मुंबई महापालिकेच्या इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ३८ कोटी ७२ लाख रुपयांचे १९ हजार ९५९ टॅब खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाला १४ जानेवारी रोजी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपकडून झालेल्या विरोधाला न जुमानता सत्ताधारी शिवसेनेने (Shiv Sena) विरोधी पक्षाला हाताशी धरून बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केला आहे.
आधुनिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना टॅब देण्यास भाजपचा विरोध नाही. मात्र २०१५ ला पालिकेने ६ हजारात खरेदी केलेल्या एका टॅबची किंमत २० हजार कशी काय झाली, असा सवाल करीत भाजपने टॅब खरेदीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप करीत प्रस्ताव मंजूर करण्यास विरोध केला होता.