उपमुख्यमंत्री फडणवीस यांची हातचलाखी…..!

By Anant Nalawade

Twitter : @nalawadeanant

मुंबई: आर्थिक नियोजनात सरकारने हातचलाखी केल्याचे सांगण्यात येत असून, वित्तमंत्री फडणवीस यांच्याकडे असलेल्या वित्त, गृह, ऊर्जा, जलसंपदा अश्या विभागांकडे या पुरवणी मागण्यामधील सर्वात मोठा हिस्सा देण्यात आल्याने मूळ अर्थसंकल्पाशिवाय अधिकचा निधी या विभागांना उपलब्ध होणार असल्याचे दिसून येत आहे.

राज्याचा २०२३- २४ चा अर्थसंकल्प केवळ दहा दिवसांनी सादर होणार असताना ६३८३ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत मांडल्या. तातडीने काही निधीच्या तरतुदी करण्यासाठी या पुरवणी मागण्यांमध्ये गृह विभागाच्या २६९१ कोटी रूपयांच्या मागण्या आहेत. याशिवाय महसूल आणि वन विभागाच्या ७४३ कोटी, कृषी, पशु संवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास विभागांच्या १२२७ कोटी, शालेय शिक्षण विभागाच्या १९०० कोटी, नगरविकास विभागाच्या २५० कोटी, वित्त विभागाच्या २०६३ कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ७३९ कोटी रूपयांच्या जलसंपदा विभागाच्या २४४ कोटी रूपयाच्या मागण्यंचा समावेश आहे.

राज्याचा अर्थसंकल्प येत्या ९ तारखेला सादर होणार आहे. राज्य सरकारच्या आर्थिक शिस्तीचा भंग त्यातून झाल्याचे दिसून येत असल्याची टिका विरोधकांकडून केली जात आहे. सरकारकडून ज्या आर्थिक मागण्या करायच्या आहेत त्याची तरतूद अर्थसंकल्पात करणे शक्य असताना सरकारने मात्र पुरवणी मागण्या मांडून त्या मंजूर करण्याबाबत प्रस्ताव पहिल्याच दिवशी सभागृहात मांडल्याने राज्याच्या आर्थिक नियोजनात सरकारने हातचलाखी केल्याचे सांगण्यात येत आहे.

वित्तमंत्री फडणवीस यांच्याकडे असलेल्या वित्त, गृह, ऊर्जा, जलसंपदा तर सहकार अशा  भाजपकडे असलेल्या विभागांकडे या पुरवणी मागण्यामधील मोठा हिस्सा देण्यात आल्याने मूळ अर्थसंकल्पाशिवाय अधिकचा निधी या विभागांना उपलब्ध होणार असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री गटाच्या मंत्र्यांना ठेंगा

मुख्यमंत्री गटाचे मंत्री असलेले उद्योग मंत्री उदय सामंत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदर विकास मंत्री दादा भुसे, परिवहन व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी मंत्र्यांच्या विभागांना या पुरवणी मागण्यात ठेंगाच दाखवण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here