मुंबई भाजपची सरकारकडे मागणी

By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: कोटींची उलाढाल असलेला आणि मराठी तरुणांना रोजगार देणारा गणेशमूर्ती कारखाने हा उद्योग बंद करुन मराठी माणसाचा रोजगार बुडवू नका, यावर्षी ही पीओपीच्या गणेशमूर्तींना परवानगी मिळायलाच हवी, मुंबई महापालिकेने घातलेली बंदी आम्हाला मान्य नाही, अशी ठाम भूमिका रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी मांडली.

लालबाग- परळ गणेशमूर्तीकार संघातर्फे आज परेल येथे महाराष्ट्रातील मुर्तीकारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड.आशिष शेलार उपस्थित होते. या मेळाव्यात त्यांनी उपस्थित जनसमुदायाने या संदर्भातील मते जाणून घेतल्यानंतर त्यांनी सविस्तर भुमिका मांडली.

यावेळी ते म्हणाले की, मुर्तीकार ही एक मोठी इंडस्ट्री आहे, रोजगार निर्माण करणारे राज्यातलं मोठं साधन आहे. पूर्ण जगभरामध्ये महाराष्ट्रात निर्माण केलेल्या या मुर्त्याच्या देवाण-घेवाणीमधून ७० हजार ते ८० हजार कोटीपर्यंत उलाढाल होते.

एवढं मोठं काम असलेली ही इंडस्ट्री एका निर्णयाकडे बोट दाखवून जर बंद करण्याचा प्रयत्न कोण करीत असेल तर आमचा विरोध आहे. पीओपीच्या मुर्तीवर बंदी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर तो जनहिताचा नाही. महाराष्ट्र हिताचा नाही, देश हिताचाही नाही. ज्या वेळेला शास्त्रज्ञांनी पीओपीच्या मुर्त्यासुद्धा शास्त्रीय दृष्ट्या विरघळू शकतात, पर्यावरण घातक न ठरता सुद्धा विसर्जन होऊ शकते, या गोष्टी समोर आणल्या आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने सरकारने विचार करावा, असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

विशेषतः मुंबई महानगरपालिकेने जे परिपत्रक काढले आहे की, चार फुटाकांच्या खालील मुर्ती या शाडू मातीच्याच असाव्यात, हे आम्हाला बिलकुल मान्य नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः पालिका आयुक्त , उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी बोललो आहे. सकारात्मक चर्चा आहे, न्यायालयीन आदेश काहीही असले तरी या पद्धतीने निर्णय होणे अपेक्षित आहे. पण हा मराठी माणसाचा रोजगार कुठे बंद होता कामा नये, यासाठीच भूमिका घेऊन आम्ही चाललो आहोत, असेही अँड. शेलार यांनी स्पष्ट केले.

जी मुंबई महापालिका गेली पंचवीस वर्षे मुंबईतील ३,५०० दशलक्ष लिटर सांडपाणी रोज समुद्रात कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करात सोडते आहे, त्या मुंबई महापालिकेला फक्त गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते हे बोलण्याचा अधिकार आहे का? ८० हजार कोटींच्या ठेवी असताना का सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु केले नाहीत? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here