काँग्रेस कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या भावाचा भाजपा प्रवेश 

भाईंदर: काँग्रेस नेते तथा माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचा भाऊ मुनावर यांचा भाजपा प्रवेश घडवुन आणल्याचा भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी चालवलेला प्रचार त्यांच्याच अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. कारण मुझफ्फर यांच्या वडिलांनीच मुनावर यांना वीस वर्षा पुर्वीच कुटुंबातुन दूर केले असुन तेव्हा पासुन मुझप्फर यांच्याशी संपर्कच नाही. त्यातच मुनावर यांच्यावर अनधिकृत बांधकामा प्रकरणी पालिकेने गुन्हा दाखल केला असुन त्यांचे पुर्नविकासाचे काही प्रकल्प देखील बारगळल्याने लोकांमध्ये संताप आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी मुझफ्फर यांना राजकीय शह देण्याच्या प्रयत्नात मेहताच कोंडीत सापडण्याची शक्यता आहे .

मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघातुन यंदा काँग्रेसच्या वतीने माजी आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांची उमेदवारी निश्चीत आहे. दुसरीकडे भाजपाचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना मुझफ्फर हे प्रतिस्पर्धी ठरणार असल्याने मेहतांनी देखील स्वत: आणि नगरसेवकांच्या माध्यमातुन मुझफ्फर यांच्या उमराव ट्रस्टचे रुग्णालय लक्ष केले आहे.

काँग्रेसचे आणि काँग्रेस समर्थक नगरसेवकांना सुध्दा फोडण्याचे प्रयत्न मेहतांनी चालवले असुन नरेश पाटील व अमजद शेख यांना फोडण्यात ते यशस्वी ठरले आहेत. परंतु मुनावर उर्फ मुन्ना हुसेन यांना भाजपा प्रवेश घडवुन आणत मेहता यांनी शहरात काँग्रेस नेते मुझफ्फर यांचा भाऊच भाजपात आल्याचा जोरदार प्रचार चालवला आहे. यातुन मुझफ्फर व त्यांच्या कुटुंबियांना धक्का देण्याचा प्रयत्न मेहतांनी केलाय.

परंतु राजकीय जाणकार आणि मुनावर हुसेन यांची माहिती असणारे जाणकार सय्यद मोईनुद्दीन , साबीर शेख आदींनी मात्र मुनावर यांचा भाजपा प्रवेशा मागे केवळ राजकियच नव्हे तर मेहतांची आर्थिक समीकरणं देखील जुळल्याचे ते म्हणाले . हुसेन कुटुंबियांना जवळुन ओळखणााऱ्याना वस्तुस्थिती माहिती आहे. सुमारे 1995 दरम्यान सय्यद नजर हुसेन यांनी मुनावर यांच्या गोष्टी न पटल्याने त्यांना कुटुंबातुन दूर केलेले आहे. तेव्हा पासुन मुझफ्फर यांनी देखील वादग्रस्त मुनावर यांच्याशी राजकिय वा व्यावसायीक तर सोडाच पण कौटुंबिक संबंध पण ठेवलेले नाहित.

बांधकामांवर कारवाई टाळण्यासह अन्य कायदेशीर अडचणीं मध्ये पालिका आणि प्रशासनावर पकड असणारे भाजपा आ. नरेंद्र मेहता यांची मोठी मदत मुनावर यांना होणार आहे. यात मोठे अर्थकारण देखील दडलेले आहे . त्यातच मुझफ्फर यांच्या भावाने भाजपात प्रवेश केला असा प्रचार करुन शहरातील नागरीकां मध्ये देखील चर्चेचा विषय घडवुन मुझफ्फर व कुटुंबियांना राजकिय धक्का देण्याची खेळी या मागे मेहतांची असल्याचे स्पष्ट आहे. पण मुनावर यांच्या भाजपा प्रवेश मेहतांच्याच अडचणीचा ठरणार असल्याचे देखील साबीर व मोईनुद्दीन त्यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here