@maharashtracity
मनपाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या आरती पवार विजयी
शिवसेनेच्या देवरे पराभूत
धुळे: धुळे महानगर पालिकेच्या (DMC) प्रभाग 5 ब मधील पोटनिवडणुकीत भाजपाच्या (BJP) उमेदवार आरती अरुण पवार यांचा 4 हजार 408 मतांनी विजय झाला. तर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) उमेदवार अनिता संजय देवरे यांना केवळ 1614 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.
पवार यांच्या विजयाची घोषणा होताच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे पोटनिवडणुकीत (by-election) भाजपाचाच करिश्मा कायम दिसून आला.
महापालिकेच्या प्रभाग 5 ब पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. या निवडणूकीत भाजपातर्फे आरती अरुण पवार, महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या अनिता संजय देवरे, मनसेतर्फे (MNS) संध्या सतिष पाटील व अपक्ष उमेदवार विद्या संजय नांद्रे हे चार उमेदवार रिंगणात होते. तथापि, खरी लढत महाविकास आघाडी (MVA) व भाजपातच होती. त्यामुळे त्यांनी प्रचारावर चांगलाच भर दिला होता.
बुधवारी सकाळी मतमोजणी झाली. त्यात भाजपच्या आरती पवार यांना चार हजार 408 मते मिळाली तर शिवसेनेच्या अनिता देवरे यांना केवळ एक हजार 614, मनसे उमेदवार विद्या नांद्रे यांना 315, अपक्ष उमेदवार संध्या पाटील यांना 140 मते मिळालीत. पवार यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.