गेल्या काही दिवसांपासून अन्य पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे पक्षात कसलाही गोंधळ होण्याची शक्यता नसल्याचे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज, गुरुवारी व्यक्त केले. बाहेरून आलेल्यांना पचवून पक्षातील मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. ते नागपुरातील प्रेसक्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

याप्रसंगी सहस्त्रबुद्धे म्हणाले की, भाजप हा संघटनेवर आधारित पक्ष असून आम्ही केलेल्या कामगिरीचे राजकारण करतो. आमच्या कार्यशैलीमुळे प्रभावित होऊन अनेक लोक भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असल्याने बाहेरून पक्षात येणा-यांमुळे पक्षात कसलाही गोंधळ नाही. तसेच पक्ष अशा प्रकारचा गोंधळ होऊ देणार देखील नाही. बाहेरून आलेल्यांना व्यवस्थीत पचवून मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ द्यायचा नाही याची दक्षता भाजप नेहमीच ठेवत आल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी मोदी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने केलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती दिली. तसेच सरकार पं. दिनदयाल उपाध्याय यांच्या तत्त्वांवर चालत असून अंत्योदयासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. आर्थिंक मंदीवर भाष्य करताना सहस्त्रबुद्धे म्हणाले की, संपूर्ण जगात मंदी सदृष्य वातावरण असून त्याचा प्रभाव भारतातही दिसून येतो आहे. केंद्र सरकार यासंदर्भात उपाययोजना करीत असून लवकरच या संकटावर मात केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

आरक्षणामुळे मेरिटवर अन्याय नाही

“सेव्ह मेरिट सेव्ह नेशन” आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सहस्त्रबुद्धे म्हणाले की, सामाजिक व आर्थिक मागासांना आपल्याकडे आरक्षणाची तरतूद आहे. परंतु, त्यामुळे मेरिटवर परिणाम होत असल्याचा त्यांनी इन्कार केला. प्रत्येक आरक्षणात त्या-त्या प्रवर्गातील मेरीटलाच संधी मिळत असल्यामुळे आरक्षणामुळे मेरिट माघारत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here