@masole_santosh

महाविकास आघाडीचे सत्तास्थापनेचे स्वप्न धुळीस

महत्वाच्या लढतीत किरण पाटील, संग्राम पाटील ठरले जायंट किलर!

धुळे: धुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपने 15 गटापैंकी आठ जागांवर तर 30 गणांपैकी 15 जागांवर विजय मिळविला आहे. यामुळे जिल्हा परिषदेत पुन्हा भाजपचीच सत्ता स्थापन होणार हे आता स्पष्ट झाले आहे. (BJP retained power in Dhule ZP)

महाविकास आघाडीने (MVA) ही निवडणुक एकत्रित लढवूनही त्यांना भाजपला रोखण्यात अपयश आले आहे. (MVA failed to stop BJP in elections) यामुळे महाविकास आघाडीचे सत्ता स्थापनेचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले आहे.

शिवाय, या निवडणुकीत महत्वाच्या असलेल्या लढतींमध्ये गुजरात राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील (Gujarat BJP state president C R Patil) यांच्या कन्या धरती देवरे यांचा विजय झाला आहे. तर भाजपचे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे यांचा पराभव झाला. तसेच राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या पत्नी वैशाली शिंदे यांचाही पराभव झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या 15 पैकी 14 गट आणि 30 पैकी 28 गणांच्या पोटनिवडणूकीसाठी मंगळवारी मतदान झाले. बुधवारी सकाळी मतमोजणीनंतर धुळे जिल्ह्याचे चित्र स्पष्ट झाले.

या मतमोजणीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महत्वाच्या लढतींमध्ये धुळे तालुक्यातील लामकानी गटातून भाजपच्या धरती निखील देवरे यांनी शिवसेनेच्या परशुराम देवरे यांचा पराभव केला. धरती देवरे यांना चार हजाराहून अधिक मते मिळाली.

तर कापडणे गटातून राष्ट्रवादीचे किरण पाटील यांनी भाजपचे रामकृष्ण खलाणे यांचा पराभव केला. तसेच किरण पाटील यांच्या पत्नी मिनल किरण पाटील यांनीही मुकटी गटातून भाजपच्या कल्पना पाटील यांचा पराभव केला.

Also Read: धुळे-नंदुरबार मध्ये ओला दुष्काळ जाहीर करा – आमदार अमरीश पटेल

नगाव गटातून भाजपचे राम भदाणे यांनी काँग्रेसचे सागर पाटील यांचा, तर कुसुंबा गटातून भाजपचे संग्राम पाटील यांनी राष्ट्रवादीचे किरण शिंदे यांच्या पत्नी वैशाली शिंदे, शिवेसेनेचे आधार हाके यांचा पराभव केला.

आ.रावल, आ.पटेल, आ.पाटील यांचे वर्चस्व कायम

या निवडणुकीत भाजपच्या तीन जागा कमी झाल्या असून राष्ट्रवादीच्या तीन जागा वाढल्या आहेत. कापडणे, मुकटी आणि शिंदखेडा गटातून तीनही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. यामुळे भाजपच्या या तीन जागा कमी झाल्या आहेत.

तसेच शिंदखेडा गटातून भाजपचे तीन उमेदवार तर शिरपूर गणातून सर्वच्या सर्व सहा भाजप उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे आ.कुणाल पाटील यांनीही धुळे तालुक्यात मेहनत घेऊन काँग्रेसचे उमेदवार निवडून आणले.

यामुळे भाजपचे आ.जयकुमार रावल (BJP MLA Jaikumar Rawal), आ.अमरिश पटेल (MLA Amrish Patel) आणि आ.कुणाल पाटील (Congress MLA Kunal Patil) यांनी त्या-त्या तालुक्यात आपले वर्चस्व कामय राखले आहे.

जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता ः

धुळे जिल्हा परिषदेत पोटनिवडणुकीआधीचे पक्षीय बलाबल पाहता एकूण 56 गटांपैकी भाजपने 39 जागा जिंकल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या तीन जागा घटल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या तीन जागा वाढल्या आहेत.

यामुळे भाजपकडे अजूनही 36 जागांचे संख्याबळ आहे. तर शिवसेना 04, काँग्रेस 07, राष्ट्रवादी 06, अशा महाविकास आघाडीकडे 17 जागा आहेत. तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे पक्षीय बलालब पाहता धुळे जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपची सत्ता स्थापन होईल.

पक्षीय बलाबल असे ः

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीतील 15 गटापैंकी भाजप ः 8, शिवसेना ः 2, काँग्रेस ः 2, राष्ट्रवादी ः 3 गटात विजय मिळविला.

जि.प.च्या पोटनिवणुकीतील 30 गणांपैकी भाजप ः 15, शिवसेना ः 3, काँग्रेस ः 5, राष्ट्रवादी ः 3, अपक्ष ः 4 गणात विजय मिळविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here