@maharashtracity

उपनगराध्यक्ष पदावर बापू गितेंचा विजय

निवडणुकीत काँग्रेस उमेदवार गैरहजर

धुळे: साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदावर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) जयश्री पवार यांची बिनविरोध निवड झाली. तर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे बापुसाहेब गिते हे 17 पैकी 11 मते मिळवत विजयी झाले. शिवसेनेच्या (Shiv Sena) पंकज मराठे यांना अपक्षासह 5 मते मिळाली.

साक्री नगरपंचायत निवडणुकीत प्रथमच भारतीय जनता पक्षाने 17 पैकी 11 नगरसेवक निवडून आणत एकहाती सत्ता मिळविली. तर चार जागा शिवसेनेला मिळाल्या. एक जागा अपक्षाला तर एका जागेवर काँग्रेस (Congress) नगरसेवक निवडू आला.

नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती (ST reserve) महिला आरक्षण जाहीर झाले होते. त्यानुसार प्रभाग आठमधून विजयी झालेल्या भाजपच्या जयश्री हेमंत पवार यांना पक्षाने उमेदवारी दिली. नगराध्यक्षपदासाठी जयश्री पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची नगराध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली.

पिठासन अधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होत्या. निवासी नायब तहसीलदार गोपाळ पाटील, प्रशिक्षण नायब तहसीलदार कल्पेश जाधव, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवेंद्रसिह परदेशी यांच्या उपस्थितीत निवड घोषित करण्यात आली.

नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणुक झाली. त्यात भाजपचे बापू गिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर विरोधकांतर्फे शिवसेनेचे नगरसेवक पंकज मराठे यांनी अर्ज दाखल केला. अर्ज छाननी प्रक्रिया झाल्यावर सर्व 17 नगरसेवकांमध्ये हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात भाजपच्या बापु गिते यांना 11 मते मिळाली तर पंकज मराठे यांना शिवसेनेसह अपक्षाचे मिळून 5 मते मिळाली.

काँग्रेस पक्षाच्या एकमेव नगरसेविका नरगीसबी याकुबखाँ पठाण या निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहिल्या. सर्वाधिक मते मिळवत बापु गिते यांची उपनरागध्यक्ष पदावर निवड झाली.

नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या निवडीनंतर भाजपच्यावतीने नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जि.प.सदस्य हर्षवर्धन दहिते, माजी नगरसेवक अँड. पुनम काकुस्ते, भाजपाचे शहर कल्याण भोसले, धनराज चौधरी उपस्थित होते.

मतमोजणीच्या दिवशी महिलेचा खून झाल्याच्या घटनेमुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव हे स्वतः साक्रीत तळ ठोकून होते. तसेच यावेळी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here