@santoshmasole

जळगावसारखा चमत्कार घडणे धूसर
बंडोंबाना थंडोबा करण्यात वरिष्ठांना यश

धुळे: धुळे महानगर पालिकेच्या (DMC) दुसर्‍या सत्रातील महापौर पदासाठी नगरसेवक प्रदीप उर्फ नाना कर्पे (Nana Karpe of BJP) यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले आहे.

महाविकास आघाडी (MVA) जळगावसारखा (Jalgaon) चमत्कार करणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होत्या. परंतू, भाजपातील (BJP) वरिष्ठांनी पक्षांतर्गत बंडोबांना थंडोबा करण्यात यश मिळविल्याने आता चमत्काराच्या शक्यता धूसर झाल्या आहेत. यामुळे धुळे महापालिकेवर पुन्हा भाजपाचाच महापौर विराजमान होईल हे आता निश्‍चित मानले जात आहे.

महापालिकेच्या प्रथम सत्रातील महापौरांची अडिच वर्षाची मुदत दि. ३० जून रोजी संपली होती. पुढच्या अडिच वर्षांसाठी महापौर निवडला जाणार आहे. धुळे महानगर पालिका निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी महापौर पदासाठी निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. दि.१७ रोजी सकाळी ११ वाजता धुळे महापालिकेची महासभा घेण्यात येईल. महानगर पालिका सदस्यांची विशेष बैठक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या स्व.भारतरत्न डॉ.अटलबिहारी वाजपेयी सभागृहात ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.

सोमवार दि.१३ रोजी सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळात नगरसविच मनोज वाघ यांच्याकडे महापौर पदासाठी पाच उमेदवारांनी सहा नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यात भाजपातर्फे प्रदीप कर्पे यांनी दोन, काँग्रेसच्या मदिना समशेर पिंजारी, शिवसेनेतर्फे ज्योत्स्ना पाटील, अपक्ष मोमीन आसिफ इस्माईल, एमआयएमतर्फे सईदा इक्बाल अन्सारी यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला.

धुळे महापालिकेत ७४ नगरसेवक आहेत. त्यात भाजपाचे ५० नगरसेवक आहेत. यामुळे भाजपातर्फे महापौर पदासाठी नगरसेविका प्रतिभा चौधरी, प्रदीप कर्पे, वालीबेन मंडोरे, संजय पाटील, देवा सोनार या इच्छूकांनी मोर्चेबांधणी सुरु केली होती.

परंतू, वरिष्ठांनी अखेर प्रदीप कर्पे यांच्या नावाला पसंती दिली. शिवाय, पक्षातील बंडोबांना थंडोबा करण्यातही यश आले. यामुळे महापौर पदाची माळ प्रदीप कर्पे यांच्या गळ्यात पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कर्पे हे मुंढे समर्थक मानले जातात. तसेच त्यांचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशीही जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे बोलले जाते. यामुळे आता ऐनवेळी काहीतरी चमत्कार होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, भाजपाने सर्वच नगरसेवकांना दमन येथे सहलीसाठी पाठविल्याने ती शक्यताही मावळली आहे.

पक्षीय बलाबल असे…

भाजपा – ५०
शिवसेना – २
राष्ट्रवादी – ९
काँग्रेस – ५
एमआयएम – २
समाजवादी पार्टी – २
बसपा – १
लोकसंग्राम पक्ष – १
अपक्ष – २

Previous articleआतापर्यंत ३३ हजार १५६ खड्डयांनी घेतला मोकळा श्वास
Next articleक्लिनअप मार्शल व नागरिकांमध्ये हाणामारी
Santosh Masole
सन १९९१-९२ पासून 'अविरोध' या जिल्हा वृत्तपत्रातून पत्रकारितेचे धडे घेतले. १९९३ पासून 'आपला महाराष्ट्र' या जिल्हा दैनिकात प्रत्यक्ष वार्तांकनाला सुरुवात. देशदूत, सकाळ, गावकरी, लोकसत्ता, दिव्य मराठी या वृत्तपत्रांतून विविध ज्वलंत प्रश्नांवर लेखन. साप्ताहिक 'चित्रलेखा'तून लेखन, आकाशवाणी धुळे केंद्रावरून क्रीडा आणि ताज्या घटनांचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमांचे सादरीकरण आणि प्रक्षेपण, "लोकवृत्त"या धुळे जिल्ह्यातल्या अल्प काळात प्रशासन प्रिय झालेल्या जिल्हा वृत्त वाहिनीचे संस्थापक संचालक. वृत्तपत्रांतून सहकारातील दूध संघांची वाताहात, आदिवासी दुर्गम भागातून होणारी सागवानी लाकडाची तस्करी, परिवहन महामंडळातील प्रशासकीय अंदाधुंदी, न्यायालयीन कामकाज आणि कायदा सुव्यवस्थेतील प्रासंगिक स्थिती यावर परखड भाष्य अशा विविध विषयांवर प्रकाशझोत. सहकारातील भ्रष्ट कारभार पुराव्यासह चव्हाट्यावर आणण्याचे प्रयत्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here