राजभवनने शक्यता फेटाळली

मुंबई
महाराष्ट्रातील (Maharashtra) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) करोना (caronavirus) प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने (BJP) सरकार विरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. यासाठी राजभवनचा (Raj Bhavan) सहारा घेतला जात असल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) करत आहे. त्याचवेळी या संधीचा राजकीय लाभ उठवण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट (Presidential Rule) लागू करावी, यासाठी भाजपने दबावतंत्र सुरू केल्याचा दावा केला जात आहे. राजभवन येथील सूत्रांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.


गेल्या दोन-तीन दिवसातील राजकीय घडमोडीमुळे राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी तीन दिवसांपूर्वी देशभरातील भाजपेतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. श्रीमती गांधी यांनी देशभरातील करोना संकट, भाजपची सत्ता नसलेले राज्य हे संकट कशा पद्धतीने हाताळत आहेत, परप्रांतीय मजुरांकडून (migrant labourers) विविध राज्यांवर खासकरून महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारवर होत असलेली टीका आणि रेल्वेद्वारे (Shramik trains) या मजुरांना त्यांच्या मूळ राज्यात पाठवण्यासाठी येत असलेल्या अडचणी याबाबत माहिती जाणून घेतली.


काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अन्य राज्यातुन उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) येत असलेल्या मजुरांचे होत असलेले हाल जगजाहिर केले. यासाठी त्यांनी असंख्य मजुरांसोबत रस्त्यात भेटून चौकशी केली. काँग्रेसच्या अजेंड्यावर स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असतांना ते ज्या शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महाराष्ट्रात सत्तेत आहेत, त्या राज्यात या मजुरांच्या स्थलांतराचा मुद्दा व्यवस्थित हाताळला जात नसल्याबद्दल श्रीमती गांधी समाधानी नसल्याचे समजते. या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत चौकशी केल्याचे आणि ठाकरे ही व्हिडीओ कॉन्फरन्स मध्येच सोडून गेल्याचे काँग्रेसमधील सूत्रांकडून कळते. मिळालेल्या महितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि या पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हेदेखील मुंबईत करोनाचा वाढत असलेला संसर्ग आणि परिस्थिती हाताळण्यात येत असलेले अपयश यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. 


ठाकरे यांनाही “मी’ अडचणीत आणणार?

‘मी पुन्हा येणार’ अशी ‘मी’ पणाची वक्तव्य करणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्यातील मतदारांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly polls) नाकारले. त्यावेळी फडणवीस यांच्या भाजप सरकारसोबत सरकारमध्ये राहून ‘मी पुन्हा येणार’ या वक्तव्याची खिल्ली उडवणारी शिवसेना आणि त्यांचे नेते, विद्यमान मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे यांच्या ‘मी लॉकडावून उठवणार नाही, मी तुम्हाला आश्वस्त करतो, मी हे निर्णय घेतले, मी असे करणार’ अशा विविध वाक्यातून ‘मी’ पणाचा अतिरेक करत असल्याची टीका काँग्रेसमधून केली जात आहे. सरकारमध्ये असूनही या काळात फारसे काम नसलेले आणि जनतेपुढे जाण्याची संधी मिळत नसलेले काँग्रेस नेते “उद्धव ठाकरे यांना “मी” अडचणीत आणणार” अशी प्रतिक्रिया खाजगीत व्यक्त करत आहेत. “मी केले असे म्हणण्यापेक्षा आमच्या सरकारने हा निर्णय घेतला,” असे म्हटले असते तर बरे झाले असते,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केली.


भाजप संधीच्या शोधात

महाविकास आघाडी सरकारचा ‘हनिमून पिरियड’ (Honeymoon Period) संपला आहे आणि त्यांच्यात आता अंतर्गत विवाद सुरू झाले आहेत. अशा वेळी महाराष्ट्रात ‘कर्नाटक पॅटर्न’ (Karnataka Pattern) राबवावा किंवा करोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून हे सरकार बरखास्त करावे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी भाजपची व्यूहरचना (strategy) असल्याचे समजते. यासाठी भाजपने काँग्रेसमधील काही आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केल्याची माहिती एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. पक्षांतर बंदी कायदा आणि राजीनामा दिल्यास पुन्हा निवडून येण्याची खात्री नसल्याने आताच्या परिस्थितीत कोणी आमदार ‘रिस्क’ घेण्यास तयार नसल्याचे या आमदाराने सांगितले.

आधी राऊत नंतर पवार

या सर्व राजकीय घडामोडी घडत असतांना शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य (Rajya Sabha) (MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपाल (Governor) भगतसिंह कोशयारी (Bhagat Singh Koshyari) यांना कुर्निसात करावा या पद्धतीने नमस्कार केल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि त्यावरून राऊत टीकेचे धनी झाले. ज्यांच्यावर अत्यंत टोकाची टीका केली, त्याच राज्यपालांची राऊत यांनी तोंडभरून स्तुती केली.त्यांनतर राज्यपाल यांनी राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांना राज्यपालांनी राजभवनला भेटीला बोलवले. पवार यांच्या समवेत प्रफुल्ल पटेल (Praful Patel) देखील उपस्थित होते. ही औपचारिक भेट होती, अशी प्रतिक्रया पवार यांनी दिली असली तरी ‘काहीतरी शिजते’ आहे, आणि हे शिजणे म्हणजेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपाल चाचपणी करत आहेत का ? आणि याबाबतची कल्पना राऊत आणि पवार यांना दिली असावी का? अशी चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.


सोनिया गांधी यांच्या बैठकीपासून सुरू झालेल्या या राजकीय घडामोडीचा शेवट काय होतो, याचे उत्तर येणाऱ्या काही दिवसात लागेल अशी शक्यता आहे. दरम्यान, भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे (Narayan Rane) यांनी स्वतःहून राज्यपाल यांची वेळ मागितली होती आणि राज्यपाल राणे यांना पवार यांच्या भेटीनंतर भेटले. राज्यपाल यांना आता भेटल्यास पुन्हा टीका होऊ शकेल, याची शक्यता असल्याने मुंबईत (Mumbai) असूनही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याऐवजी राणे यांना राजभवनला पाठवले असावे का? अशी शक्यता चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here