By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: शिवसेना नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी विधीमंडळाविषयी आक्षेपार्ह उद्गार काढले याची गंभीर दखल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली. भाजप सदस्य आमदार अतुल भातखळकर आणि शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी राऊत यांच्या विरोधात दिलेला हक्कभंग प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष  नार्वेकर यांनी स्वीकारला. याविषयी दोन दिवसांत चौकशी करू, आठ मार्च रोजी सभागृहात निर्णय घोषित करु, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. 

अध्यक्ष नार्वेकर यांच्या या निर्णयानंतरही सत्ताधारी पक्षाचे सदस्य हे संजय राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. याप्रकरणी त्वरित निर्णय देण्याची मागणी करत होते. या वेळी सभागृहात निर्माण झालेल्या गोंधळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

या वेळी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात तीव्र भावना व्यक्त केल्या. विरोधी पक्षाकडून नाना पटोले यांनी हा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांना असून सभागृहाचा वेळ वाया न दवडता अध्यक्षांनी निर्णय घेण्याची मागणी केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी, चहापानाला न आल्याने विरोधकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘राष्ट्रद्रोही’ म्हटले, याकडे लक्ष वेधले. त्याविषयी कोणती कारवाई करणार असा प्रश्नही केला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अतुल भातखळकर यांनी दिलेला हक्कभंगाचा प्रस्ताव वाचून दाखवला. संजय राऊत यांचे वक्तव्य विधीमंडळाच्या सर्व लोकप्रतिनिधींसाठी अपमानास्पद आहे. विधीमंडळाच्या उज्ज्वल परंपरेला पायदळी तुडवणारे आहे.  राज्यघटनेचाही अवमान झाला आहे. हा सर्व विधीमंडळासह समस्त जनतेचाही अपमान आहे. यामुळे याचे सखोल अन्वेषण व्हावे अशी मागणी या प्रस्तावात असल्याचे सांगितले.

भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी यावेळी काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एका महिलेला दूरभाषवरून शिव्या दिल्या होत्या त्याचीही आठवण करून दिली.

दरम्यान, शिवसेना नेते व प्रवक्ते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधीमंडळाबाबतच्या वादग्रस्त विधानाचे तीव्र संतप्त पडसाद आज विधानसभेत उमटले.  भाजप सदस्य आशिष शेलार यांनी या आक्षेपार्ह विधानावरून राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा आग्रह धरला. प्रचंड गदारोळामुळे तालिका सभापती योगेश सागर यांना सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले.

या वेळी सत्तारूढ पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेना पक्ष प्रतोद भरत गोगावले यांनीही राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली. या वेळी सभागृहात गदारोळ सुरू होता. तालिका सभापती योगेश सागर यांना त्यामुळे सभागृहाचे कामकाज प्रथम १० मिनिट, त्यानंतर २० मिनिटे आणि त्यानंतर ३० मिनिटे असे एकूण एक तास तहकूब करावे लागले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here