पालिकेने कोविड उपाययोजनांवर खर्चलेल्या ३,८०० कोटींची चौकशी करावी
@maharashtracity
मुंबई
शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी निवडणूक लढविताना त्यांच्या संपत्तीबाबत प्रतिज्ञापत्र दिलेली खोटी माहिती चौकशीसाठी इन्कम टॅक्स विभागाकडे गेली होती. याप्रकरणी केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे. त्यातून जे काही असेल ते बाहेर येईलच, अशी सावध प्रतिक्रिया भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरील इन्कम टॅक्स विभागाच्या धाडसत्राबाबत दिली आहे.
यावेळी, भाजपचे आमदार राजहंस सिंह हे उपस्थित होते. केंद्रीय यंत्रणा नियमाने कारवाई करते. यशवंत जाधव व आमदार यामिनी जाधव यांच्या मालमत्ता, संपत्तीबाबत ज्या काही गंभीर त्रुटी आढळून आल्या असतील त्याबाबत चौकशी करीत आहेत. महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार असलेल्या कोविडसारख्या महत्वाच्या विषयांवर आणि अन्य विषयांवर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे भाजप नगरसेवकांना बोलू देत नव्हते. तसेच, नियमबाह्य पद्धतीने ऐनवेळी आणलेले प्रस्ताव अभ्यास करू न देता तसेच मंजूर केले जातात. त्यामुळेच आम्ही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात ‘अविश्वास ठराव’ आणला होता. तसे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे दिले होते, अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.
तसेच, महापालिकेत कोविड उपाययोजनांतच भ्रष्टाचार झालाय असे नव्हे तर सर्वच विभागात भ्रष्टाचार झालेला असून भाजपतर्फे आम्ही त्यावर वारंवार आवाज उठवला होता. ज्यावेळी कोविड खर्चावरील २ हजार १०० कोटी रुपयांच्या खर्चाचा विषय मंजुरीला आला होता त्यावेळी आम्ही त्याचा हिशोब मागितला असता भाजपला एकटे पडून सर्वपक्षीयांनी या खर्चाबाबतचा प्रस्ताव मंजूर केला होता, असे सांगून प्रभाकर शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
कोविड उपाययोजनांबाबत आतापर्यंत जो काही ३ हजार ८०० कोटिपर्यंत खर्च करण्यात आलेला आहे, त्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असून त्याची चौकशी करण्याची मागणी मी स्वतः पालिकेच्या अर्थसंकल्पीय भाषणातून केली होती, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.