@maharaahtracity

धुळे: राज्यातील इतर मागासवर्गीय अर्थात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा बहाल व्हावे, ओबीसी समाजावरील अन्याय दुर करावा या मागणीसाठी आज भारतीय जनता पक्षाच्यावतीने धुळे शहरात मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव रोड चौफुलीवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
आज शनिवार दि. २६ रोजी सकाळी ११ वाजेनंतर चाळीसगाव चौफुलीवर भाजप खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात ओबीसी समाजाचे प्रतिनिधी तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामिल झाले.

सुमारे तासभर घोषणाबाजी करीत महामार्ग अडवण्यात आला. अखेर पोलिसांनी खा.डॉ सुभाष भामरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार आदींना ताब्यात घेतले. वाहतुक कोंडी सोडवून महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली.

यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आघाडी सरकावर जोरदार टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, “ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद झाल्याने आज हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात ५७ टक्के ओबीसी समाज असून या समाजातील अनेक समाज बांधवांना सर्वच राजकीय पक्षातून ग्रामपंचायत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राजकीय प्रवासातून समाज सेवा करण्याचा मान मिळत होता.”

डॉ भामरे पुढे म्हणाले, न्यायालयात आरक्षणाचा विषय न्याय प्रविष्ट असतांना या महाराष्ट्र आघाडी सरकारने न्यायालयापुढे माहिती दिली नाही. बाजुही न मांडल्यामुळे न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याचा निकाल दिला. त्या निकालामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे.

ओबीसी समाजाला आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार ओबीसी नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री बावनकुळे तसेच ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाने चक्का जाम रस्ता रोको आंदोलन केले आहे, अशी माहिती डॉ भामरे यांनी दिली.

ओबीसी समाजाला त्याचे हक्काचे आरक्षण पुन्हा मिळालेच पाहिजे. त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय भाजपा गप्प बसणार नाही. असेही यावेळी खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले.

या आंदोलनात कुणबी पाटील, सोनार, धौधरी, कुणबी मराठा, भोई, सुतार, लोहार, कुंभार, वाणी, शिंपी, गुरव, गवळी, धोबी, वंजारी, बारी, कोळी, धनगर, माळी, कासार, न्हावी, पांचाळ जोशी गोंधळी, बडगुजर इ. समाज बांधव व अध्यक्ष प्रतिनिधी यांनी पाठींबा देवून आंदोलनात सहभागी झाले.

यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष हिरामण आप्पा गवळी, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष दिनेश बागुल, माजी सभापती बापु खलाणे, नगरसेवक प्रदीप कर्पे, ओम खंडेलवाल, प्रा सागर चौधरी आदींसह असंख्य भाजपा कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here