@maharashtracity
बावीस दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना गुरुवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. मणका आणि मानेच्या दुखण्याने त्रस्त झालेले मुख्यमंत्री मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात (Reliance Hospital) उपचार घेत होते.
या दरम्यान त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी मागील २२ दिवसापासून त्यांच्यावर रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनात शस्त्रक्रिया आणि उपचार सुरु होते. चाचणीच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.
त्यांना दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याने तुर्तास ते वर्क फ्रॉम होम करणार आहेत.
उद्धव ठाकरे यांना मणका मानदुखीचा त्रास झाल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल होऊन उपचार करण्याचे ठरवले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर रोजी सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
गिरगावातील एच. एन. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठका, ओमिक्रॉनच्या (omicron) पार्श्वभूमीवर होणाऱ्या आढावा बैठका यांना उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन उपस्थिती लावली होती. रुग्णालयात असतानाही मुख्यमंत्री ठाकरेंनी रुग्णालयातूनही काम सुरुच ठेवले होते.