राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुख्यमंत्री, उपुख्यमंत्री यांच्यावर टिका

@maharashtracity

By अनंत नलावडे

मुंबई: मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला धाऊन जायला पाहिजे होते. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

पुण्यात (Pune) प्रलय आल्याने शहराची वाताहात झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झाला. तर दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री इतर गोष्टीत अडकलेले आहेत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

सरकारने शिधा वाटपाची (ration in 100 rupees) घोषणा उत्साहात केली. सरकार आपली प्रतिमा सुधारण्याच्या गडबडीत आहे. त्यातून घोषणा केली. मात्र, पैशांची जुळणी झालेली नाही, असा आरोप करतानाच जुळणी झाली तर किमान दिवाळीच्या (Diwali) अगोदर घोषणा केल्याप्रमाणे वागावे, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली. मात्र सरकारने दिवाळी गोड करणार, अशी घोषणा करुन पैशांची तजवीज केली नाही. यातून सरकारची अकार्यक्षमता लक्षात येते, असा हल्लाबोलही पाटील यांनी केला.

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नामोहरम करणे आणि त्यांना अडचणीत आणणे, असा उद्योग काही लोक करत आहेत. मात्र त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उध्दव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत, असेही पाटील यांनी सांगितले.

पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाहीय. जे लोक शिवसेनेतून (Shiv Sena) फुटून गेले, त्यांनी काहीना काही उद्देश व लाभ ठरवून पक्षात घेतले आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात चित्र वेगळे असेल, असा दावाही पाटील यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here