अख्ख सरकार आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांच्या समोर आणून मांडले; ४७ दिवसांनंतर आंदोलन मागे
सरकार सकारात्मक, ८ दिवसांत बैठक, आ मेटेंच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांचा न्याय देण्याचा शब्द
मुंबई: मराठा समाजातील ३ हजार ५०० पेक्षा अधिक युवक – युवतींनी प्रचंड मेहनत घेत शासनाच्या विविध विभागांच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या. मात्र शासनातील काही झारीतील शुक्राचार्यांनी ३ वर्षांपेक्षा अधिक काळापासून या नियुक्त्या अद्याप दिलेल्या नाहीत. मराठा समाजास महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६२ मधील कलम १८ अन्वये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी. २०१४ च्या भरतीप्रक्रियेमधील उमेदवारांना तत्काळ नियुक्त्या द्याव्यात आदी मागण्या सकल मराठा समाज पुरुस्कृत एसईबीसी म्हणजेच ईएसबीसी उमेदवारांनी केल्या आहेत. गेल्या ४७ दिवसांपासून हे विद्यार्थी आंदोलनास बसलेले होते. यासंबंधी आ विनायक मेटे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी मांडून या सर्व मराठा समाजाच्या युवकांना न्याय देण्याची मागणी केली.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या युवकांना हे सरकार न्याय देणार असून यांना वाऱ्यावर सोडले जाणार नसल्याची ग्वाही दिली. यावेळी आ मेटे यांनी महाविकास आघाडीकडून सदर आंदोलन सोडवण्यासाठी मंत्र्यांचे शिष्टमंडळ पाठवण्याबाबत मागणी केली असता आ मेटे यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार यांनी येऊन येत्या ८ दिवसांमध्ये बैठक घेत हा प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचे आश्वासन सदर आंदोलनकर्त्या युवकांना दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन व ग्वाही लक्षात घेऊन आंदोलनकर्त्या मराठा युवकांना हे अंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले आहे.
मराठा तरुणांच्या शासकीय नोकरीसंदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा तरुणांचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनात काही आंदोलकांची प्रकृती खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आ मेटे यांनी या आंदोलनकर्त्यांची बाजू आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच लावून धरलेली आहे. त्यांनी सभागृहात वेळोवेळी प्रश्नावर तोडगा काढण्यासंदर्भात मागणी केलेली आहे. काल विधान परिषदेत लक्षवेधीदरम्यान आ मेटे यांनी वेळोवेळी नुसत्या बैठक घेण्यात आल्याचा आरोप करतबैठकांमध्ये कसलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगितले.
राज्यात बहुसंख्यांक असलेला मराठा समाज जिथे शक्य आहे तेथे मागे सरकवला जात असल्याचे धोरण काही विशिष्ट लोकांकडून सुरु आहे. सारथी संस्था, मराठा समाजातील परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र न देणे यातून हे सातत्याने दिसून येते आहे. निवडी ह्या न्यायालयाच्या निर्णयातून न्यायिक असतानादेखीले प्रशासनातील काही नतद्रष्ट मंडळी त्या अडकवून ठेवत आहेत. असे देखील यावेळी ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या लक्षवेधीचे सकारात्मक उत्तर दिले. ‘विनायकराव या विषयावर लवकरच तोडगा काढला जाईल, हे सरकार या युवकांच्या पाठीशी आहे , कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी शिष्टमंडळ पाठवत हा प्रश्न सोडवण्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर लागलीच मंत्री एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार व आ मेटे हे आंदोलनस्थळी पोहोचले. दोन्ही मंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधत येत्या ८ दिवसांमध्ये बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. आ विनायक मेटे यांनी जे कुणालाही शक्य झाले नाही ते करून दाखवत सरकारला आंदोलकांपुढे आणून बसवले. आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या सबळ आश्वासनावर हे आंदोलन तूर्तास मागे घेतल्याचे जाहीर केले.