@vivekbhavsar

मुंबई: मी या राज्याचा प्रशासकीय गाडा हाकणारे केंद्र. शहरी नागरिकांपेक्षा ग्रामीण जनतेला माझे खरेखुरे महत्व आणि ताकद माहिती आहे. ब्रिटिश वसाहतवाद्यांची मानसिकता झुगारून सचिवालायाचे नामकरण बदलून मंत्रालय करण्यात आल्याचं घटनेला आता अनेक वर्षे उलटली. होय… मी मंत्रालयच बोलतेय..

लोकनियुक्त नेत्यांच्या हातात या राज्याचा कारभार असतांना सचिवालय सबोधने संयुक्तिक नव्हते. याच मंत्रालयात मी अनेक सामान्य कुटुंबातील व्यक्तींना मंत्रिपदाच्या आणि मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसतांना बघितले आहे.

मागच्या नजीकच्या इतिहासात सन्माननीय (दिवंगत) विलासराव देशमुख, सन्माननीय अशोक चव्हाण, सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण, सन्माननीय देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जवळून बघितले आहे. यांची कारकीर्द बघितली आहे, अनुभवली आहे.

उद्धव ठाकरे वगळता उर्वरित मुख्यमंत्राच्या सगळ्या निर्णय प्रक्रिया मी जवळून अनुभवल्या आहेत. पण उद्धव ठाकरे यांचा सहवास उणेपूरे तीन चार महिन्याचा लाभला.

“मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…….”

तमाम मराठी माणसाचे रोमांच उभे करणारे हे वाक्य…. मलाही खूप आनंद झाला होता. रिमोट कंट्रोल ने राज्य चालवण्याची परंपरा असलेले ठाकरे कुटुंब सक्रिय राजकारणात कधी येणार नाहीत, असाच होरा असतांना, खुद्द उद्धव ठाकरे या प्रगत राज्याचे मुख्यमंत्री होणार, याचा आनंद जसा सामान्य जनतेला झाला होता, तसाच मलाही झाला होता. माझा सहावा मजला, जिथे सन्माननीय मुख्यमंत्री बसतात, ते दालन ही रोमांचीत झाले होते.

Also Read: वाहक – चालकांच्या आत्महत्येमागे एस टी बँकेची सक्तीची कर्ज वसुली कारणीभूत?

उद्धव जी, तुम्हाला आठवते? मुख्यमंत्री पद ग्रहण केल्यावर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मंत्रालयात प्रवेश करता झाला तेव्हा झाडून सगळे कर्मचारी आपल्याला बघण्यासाठी, आपले स्वागत करण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर आले होते. सुवासिनींनी आपल्याला ओवाळले होते, आपल्याला नजर लागू नये यासाठी मनोमन प्रार्थना केली होती.

उद्धव जी, असे अभूतपूर्व स्वागत यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या वाटेला आले नव्हते. आपल्यावर असलेले प्रेम आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुपुत्र या राज्याचा राज्यकारभार हाकणार आणि तो योग्यच असणार, याची खात्री सामान्य जनतेसह मंत्रालयातील माझ्या सहकाऱ्यांना होती.

उद्धव जी, तुमच्या बैठका घेणे, अधिकाऱ्यांना आणि विषयाला समजून घेणे, तुमचा साधा सरळ स्वभाव, कोणाशीही आपुलकीने वागण्याची पद्धत… याच चर्चा मंत्रालयात होत असे. फोटोग्राफरशी मारलेल्या गप्पा आणि त्यांच्याकडून कॅमेराची केलेली चौकशी… तो फोटोग्राफर अनेक दिवस आपल्या प्रभावातून बाहेरच पडला नाही.

सगळे काही सुरळीत सुरू असतांना कोरोना आला आणि सगळे ठप्प झाले. या काळात आपण आपल्या निवस्थानातून कारभार सुरू ठेवला. जनतेशी फेसबुक live च्या माध्यमातून मोठ्या भावाप्रमाणे, कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेतून संवाद साधला. जनतेला तेही आवडले.

उद्धव जी, आता सगळे व्यवहार खुले झाले आहेत. तरीही आपण मंत्रालयाकडे पाठ फिरवली आहे. आता विरोधकच नव्हे तर सामान्य जनताही आपल्यावर टीका करते आहे.

मंत्रालय या नात्याने मलाही त्याचे दुःख होते. म्हणून विनंती आहे, मी साकडे घालते… आपण परत या. सहावा मजला आपली वाट बघत आहे. बघाच तुम्ही… इथले अधिकारी, कर्मचारी तुमचे पुन्हा कसे स्वागत करते…

धन्यवाद
आपली कर्मभूमी
मंत्रालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here