दहिसर येथील करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
@maharashtracity
मुंबई: आपल्या देशात राजा हरिश्चंद्र व महर्षी दधिची यांनी दातृत्वाचे आदर्श समाजापुढे ठेवले आहेत. करोना काळात समाज बांधवांना मदत करून या परंपरेचे पाईक असल्याचे करोना योद्ध्यांनी दाखवून दिले. देशात करोनाची तिसरी लाट येण्याचा धोका कायम असल्याचे सांगून ही लाट थोपविण्यासाठी अहर्निश जागरूक राहून मास्कचा वापर, परस्परांमध्ये सुरक्षित अंतर राखणे आदी कोविड नियमांचे अनुपालन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आज येथे काढले.
दहिसर विधानसभा क्षेत्रातील ४५ करोना योद्ध्यांचा (corona warriors) राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २२) राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी व मंडळ प्रमुख अरविंद यादव व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला दहिसर येथील नगरसेवक व करोना योद्धे उपस्थित होते.
कोविड – १९ हे नाव धारण केलेला करोना विषाणू सन २०२० आले व आता २०२१ आले तरी कायम आहे हे लक्षात घेऊन परस्परांना सहयोग व नियमांचे पालन केल्यास करोनावर नियंत्रण तर मिळेलच आणि देशही अधिक प्रगती करेल असे राज्यपालांनी सांगितले.
मार्च ते नोव्हेंबर २०२० या काळात दहिसर येथील गरजू लोकांना खिचडी वाटप, महिन्याचे सामान, मास्क, सेनिटायझर आदी आवश्यक वस्तू पुरविल्याबद्दल राज्यपालांनी मनिषा चौधरी यांचे अभिनंदन केले.
राज्यपालांच्या हस्ते अनिल कान्तीप्रसाद पोद्दार, रमेश शहा, चिराग दोषी, मार्क डिसुझा, बिना शाह, नटवरलाल पुरोहित, हरीश कुमार जैन, आदीं करोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.