By Sadanand Khopkar
Twitter : @maharashtracity
मुंबई: तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही, असा गौप्यस्फोट करत, मत विभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बी आर एस पक्षाला मोठे खिंडार पडले असून त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे. तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाने काय केले याची सर्व माहिती काँग्रेसकडे असून लवकर या फसव्या तेलंगणा पॅटर्नची पोलखोल करु, असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी येथे दिला.
पटोले म्हणाले की, तेलंगणातील भारत राष्ट्र समिती महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असून त्याचा काहीही उपयोग होणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस विचाराचेच सरकार यावे ही वारकरी व जनतेची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
केसीआर यांनी ९ वर्षात तेलंगणात कोणतेही काम केलेले नाही. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांसाठी त्यांनी ठोस असे काहीही केलेले नाही. आताही कांद्याला तेलंगणात जास्त भाव असल्याचे सांगितले जात होते. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणात कांदा विक्रीस नेला असता त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. केसीआर सरकार फक्त मोठ-मोठ्या जाहीराती देऊन काम केल्याचा डांगोरा पिटत आहे. जो काम करतो त्याला जाहीरातबाजी करण्याची आवश्यकता भासत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
पंढरपूरमध्ये आषाढी वारी होत आहे. या वारीत हैदराबादहून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ६०० गाड्यांचा ताफा घेऊन येत असल्याची माहिती समजते. पंढरपुरात आषाढी वारीला १० लाख वारकरी जमतात, त्यात केसीआर यांनी बाहेरुन आणखी लोक आणून गर्दी करायची हे बरोबर आहे का? पंढरपूरचा विठोबा हा श्रद्धेचा, आस्थेचा विषय आहे, त्याचा कोणी राजकीय फायदा उठवत असेल तर योग्य नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.