#काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा आरोप
By अनंत नलावडे
Twitter: @NalavadeAnant
मुंबई: महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागात मराठी बांधवांवर होणाऱ्या हल्ल्यांमागे भाजपचा हात असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
सीमाभागातील हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रातील ट्रक, बस आणि वाहनांची तोडफोड केली जात आहे. विरोधी पक्ष सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी उभा आहे. पण मुख्यमंत्री मात्र गप्पच आहेत, अशी टीकाही थोरात यांनी केली.
गेल्या काही दिवसापासून सीमावाद चिघळला असून महाराष्ट्र आणि कर्नाटकात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. काल, मंगळवारी कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले. या घटनेवरून राज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना थोरात यांनी भाजपवर तुफान टीका केली.
सीमा प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी
सीमा भागात मराठी लोकांवर होत असलेल्या हल्ल्यांमागे भाजप (BJP) असून यामागे त्यांचा काय स्वार्थ आहे, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. सीमा प्रश्नावर भाजप चुकीचे राजकारण करत आहे. कर्नाटक (Karnataka) आणि केंद्रात भाजपचेच सरकार असल्याने केंद्रातून कर्नाटकला काही सूचना येत आहेत का, हे आम्हाला माहित नाही. पण हा विषय गंभीर असल्याने आपल्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलावून चर्चा केली पाहिजे. वस्तुस्थिती सांगावी आणि सरकारची भूमिका मांडावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.
कर्नाटकची अशा प्रकारची दंडेली महाराष्ट्र सहन करणार नाही. सीमाप्रश्नावर (Maharashtra – Karnataka border dispute) महाराष्ट्राची भूमिका काय आहे? पुढचे धोरण काय असेल ? यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणीही थोरात यांनी केली.
कर्नाटकमध्ये जाणीवपूर्वक सीमाभागातील मराठी बांधवांची गळचेपी केली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) आणि त्यांचे मंत्री सातत्याने महाराष्ट्र विरोधी विधाने करत आहेत. कर्नाटकच्या या दंडेलशाहीविरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्पष्ट आणि खंबीर भूमिका घेत नाहीत, अशीही टीका थोरात यांनी केली.