@maharashtracity
मोदींनी महाराष्ट्र व देशाची माफी मागावी
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल संसदेत केलेले वक्तव्य संपूर्ण देशवासियांचा विशेषतः महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व पंजाब या राज्यांमधील जनतेचा, तेथील श्रमिकांचा अपमान (insult of labours) करणारा आहे. त्यांचे वक्तव्य हे महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही असून त्यांनी या वक्तव्याच्या माध्यमातून असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Dr Nitin Raut) यांनी केली आहे.
मोदींचे हे व्यक्तव्य म्हणजे एका पराभूत सम्राटाची हताशा आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दल देशातील नागरिक त्यांना कधीही क्षमा करणार नाही. कोरोनाच्या (corona) आघाडीवर आलेल्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा मोदींनी दाखवून जनतेची माफी मागावी, अशी मागणी डॉ नितीन राऊत यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान केली.
“खरेतर हजारो मैल पायी चालत गेलेल्या व या प्रवासात आपले कुटुंबिय गमावलेल्या मजुरांची (migrant labours) मोदींनी माफी मागायला हवी होती. उलट त्यांनाच सुपर स्प्रेडर ठरवून मोदींनी देश निर्माणात अमूल्य योगदान देणाऱ्या मजुरांचा अपमान करून त्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे”, असे ते यावेळी म्हणाले.
उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand) व पंजाबात (Punjab) गेलेल्या सर्व मजुरांनी मोदींना व त्यांच्या पाठिशी उभे राहणाऱ्या पक्षाला माफ करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. या तीनही राज्यात भाजपविरोधी मतदान होणार असल्याने आपल्या अपयशाचे खापर काँग्रेसवर (Congress) फोडण्याचे क्षुद्र राजकारण मोदी करत आहेत, असे ते म्हणाले.