@maharashtracity

धुळे: खान्देशातील (Khandesh) शेतकऱ्यांना पिक विम्यासह अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम द्यावी आणि अतिवृष्टीतील पिक विम्यात मका आणि कपाशी पिकांचा समावेश करावा, अशी मागणी आपल्या तारांकित प्रश्‍नाव्दारे काँग्रेसचे आ. कुणाल पाटील (Congress MLA Kunal Patil) यांनी विधानसभेत केली.

दरम्यान तारांकित प्रश्‍नात धुळे तालुक्यातील बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पुनर्जिवीत करण्यासाठी शासनाने मदत करावी, अशीही मागणी आ.पाटील यांनी अधिवेशनात केली.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला मुंबईत दि. 21 डिसेंबरपासून सुरुवात झाली असून आ. पाटील हे धुळे तालुका आणि जिल्ह्यातील प्रश्‍न मांडत आहेत. धुळे तालुक्यासह संपूर्ण खान्देशात अतिवृष्टीमुळे खरीपातील पिके आणि इतर फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते.

जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाच्या खंडामुळे धुळे जिल्हयात तब्बल 38 हजार 55 हेक्टर क्षेत्रावरील 47 हजार शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला होता. तसेच 5 ते 13 सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे 97 टक्के क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

त्यामुळे अतिवृष्टीतील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना विमा मंजुर (crop insurance) करण्यात यावा तसेच अतिवृष्टीच्या (heavy rain) नुकसान भरपाईच्या पॅकेजची (compensation Package) रक्कमही त्वरीत देण्यात यावी. तसेच मुख्य पिक असलेल्या कापूस आणि मका पिकाला विमा देण्याबाबत विमा कंपनी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये संतप्त भावना आहे. म्हणून कापूस आणि मका पिकाला पिक विमा देण्याबाबत विमा कंपनीला आदेश द्यावेत, अशीही मागणी आ. पाटील यांनी केली आहे.

धुळे तालुक्यातील बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांबाबत (Regional water supply scheme) तारांकित प्रश्‍न मांडतांना आ. पाटील यांनी सांगितले कि, धुळे तालुक्यात फागणे व 21 गावे प्रादेशिक पा.पु. योजना, बोरकुंड व 4 गावे प्रादेशिक पा.पु.योजना, बाबरे व 6 गावे प्रादेशिक पा.पु.योजना, सडगाव व 8 गावे प्रादेशिक पा.पु.योजना करोडो रुपये खर्च करुन उभारण्यात आल्या आहेत.

मात्र विज बिल आणि दुरुस्ती खर्चाअभावी या योजना बंद आहेत. योजना सुरु करण्यासाठी शासनाने मदत करुन त्यांचे पुर्नजीवन करावे, अशी मागणी केली.

आ. पाटील यांनी मांडलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले कि, प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आ. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक लावली जाईल व प्रश्‍न सोडविण्यासाठी उपाययोजना केली जाईल.

हिवाळी अधिवेशनकरीता आ.पाटील यांची विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here