भाजप सोबत गेलात तर काँग्रेस विरोधात उभी राहील!
@SantoshMasole
धुळे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील गुप्त बैठक आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ही शक्यता गृहीत धरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी शिवसेनेला (Shiv Sena) थेट आव्हान दिले आहे. भाजपा सोबत गेला तर काँग्रेस तुमच्या विरोधात उभी राहील, असा इशाराच नाना पटोले यांनी दिला आहे.
नाना पटोले उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. धुळे जिल्हा परिषदेच्या (Dhule ZP) पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले गुरुवारी धुळ्यात होते. त्यावेळी त्यांनी शहरातील प्रसार माध्यमांच्या निवडक प्रतिनिधींशी संवाद साधला.
पटोले म्हणाले, “भारतीय जनता पक्ष आमचा पारंपरिक शत्रू आहे. केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकार देशाला संपवू पाहत आहे. संविधानिक व्यवस्थेला न मानणार्या भाजपा पक्षासोबत कोणी जात असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतू, काँग्रेस नेहमीच भाजपविरोधात उभी राहीली आहे आणि यापुढेही ती उभी राहील. एवढेच नव्हे, तर भाजप सोबत जे-जे जातील, राहतील त्यांच्याविरोधात काँग्रेस उभी राहील.”
पटोले म्हणाले, की देशात आज अराजकतेची स्थिती आहे. करोना महामारीच्या दुसर्या लाटेतील संकटामुळे मोठी जीवित, आर्थिकहानी झाली. देशाचे झालेले नुकसान भरून निघणे अवघड असताना आता तिसर्या लाटेचे संकट समोर आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकतीच श्वेतपत्रिका काढून केंद्रातील मोदी सरकारला आरसा दाखविला आहे. तरीही केंद्र सरकारकडून काहीच उपाययोजना होताना दिसत नाहीत. आमच्या दृष्टीने हाच महत्त्वाचा प्रश्न असून, देशवासीयांना करोना सारख्या महामारीत वार्यावर सोडून देणार्या केंद्राच्या विरोधात आपली भूमिका काँग्रेस ठामपणे पुढे नेत आहे.
मोदी बहरुपी, सात वर्षात आठ वेळा रडले!
दोंडाईचा येथे झालेल्या सभेत नाना पटोल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टिका केली. येथे झालेल्या सभेत पटोले म्हणाले, की मोदी हे बहरुपे आहेत, प्रचारजिवी आहेत. ते सात वर्षात किमान आठ वेळा रडले. मोदी सरकारने संविधानिक व्यवस्था संपविण्याचे काम सुरु केले आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण काढण्याचे महापापही भाजपनेच केले. केंद्र सरकार राष्ट्रीय जनगणनेचे आकडे देण्यास तयार नाही. त्यांनी आडमुठे धोरण स्वीकारले आहे. यामुळे राज्य सरकारने ओबीसी आयोगाची स्थापना केली. मात्र, कोरोनासारख्या महामारीमुळे, पावसाळ्यामुळे आयोगाला जनगणना करता येणार नाही. यामुळे काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधानांची दिल्लीत भेट घेतली, तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती करत ओबीसी समाजावर होणार्या अन्यायाची भूमिका मांडली आहे. यामुळे भाजपचे नेते जी भूमिका मांडत आहेत ती दुटप्पी आहे, असेही ते म्हणाले.