डब्बेवाला भवनचे उद्घघाटन

@maharashtracity

मुंबई: मुंबईतील डब्बेवाले हे कोडींग पद्धतीचा अवलंब करून ज्याप्रमाणे जेवणाच्या डब्ब्यांचे वितरण करीत आहेत, त्या डब्बे वितरण व्यवस्थेचे जगभरात कौतुक केले जाते, असे प्रशंसनीय उद्गार राज्याचे पर्यटन, पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी काढले आहेत.

सन २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC polls) सत्ताधारी शिवसेनेकडून (Shiv Sena) मुंबईतील डब्बेवाल्यांसाठी (Dabbawala) हक्काची व विश्रांतीची जागा म्हणून ‘डब्बेवाला भवन’ उपलब्ध करून देण्याचे अभिवचन देण्यात आले होते. रविवारी वांद्रे येथे पालिकेने समाज कल्याण केंद्राच्या प्रशस्त जागेत अगदी अल्पावधीत उभारलेल्या दिमाखदार ‘डब्बेवाला भवना’ चे उदघाटन मंत्री आदित्य ठाकरे व परिवहन मंत्री ऍड. अनिल परब (Anil Parab) यांच्या उपस्थितीत आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, उप महापौर अँड. सुहास वाडकर,पालिका आयुक्त डॉ. इक्बाल चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे व असोसिएशनचे पदाधिकारी व डब्बेवाले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“मुंबईतील रेल्वे व बेस्ट बससेवा या जीवनवाहिन्या असून त्यांमधील रक्त म्हणजे आमचे डब्बेवाले आहेत. हे डब्बेवाले निर्धारित वेळेत जेवणाचे डब्बे आपल्यापर्यंत पोहोचवितात. त्यामुळे आमची मुंबई ही अखंडपणे धावते,” अशा शब्दात मंत्री आदित्य ठाकरे यांनी डब्बेवाल्यांचे कौतुक केले.

तसेच, मुंबईसाठी डब्बेवाला संघटनेने रक्तदान शिबीर भरवले. फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना जेवणाचे डब्बे पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. आपले अमूल्य योगदान लक्षात घेता, आपले आभार मानावे तेवढे कमी आहे. ज्याप्रमाणे डब्बेवाले यांची चौथी पिढी काम करीत आहे, त्याचप्रमाणे मी सुद्धा चौथ्या पिढीतील प्रतिनिधी असून हा एक योगायोग आहे. डबेवाला भवनचा ठराव मांडणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकर या सच्चा मुंबईकरांच्या हस्ते या डब्बेवाला भवनचे उद्घघाटन होत आहे, ही आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.

डब्बेवाल्यांसोबत रक्ताचे नाते -: महापौर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार अवघ्या १५ दिवसात जागा निश्चित करून तेथे डब्बेवाला भवन उभारण्यात आले व आज त्याचे उद्घघाटन झाले, ही आनंदाची व वचनपूर्तीची बाब आहे. माझ्या भावाला पाठविण्यात येणाऱ्या डब्यातील चपात्या आम्ही लहानपणी खाल्ल्या आहेत. त्यामुळे डब्बेवाल्यांसोबत आमचे रक्ताचे नाते जोडले गेले, या शब्दांत आपले विचार मांडत महापौर किशोरी पेडणेकर या भावुक झाल्या.

यावेळी, सोपान काका मरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून डबेवाल्यांचा संपूर्ण जीवनपट मांडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here