By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: आमचे आदर्श स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार (Dr Hedgewar) किंवा अन्य कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकांचे (Freedom fighter) धडे तुम्ही पाठ्यक्रमातून काढू शकाल. पण, लोकांच्या मनातून त्यांना कधीही काढता येणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज केले.

राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या कार्यक्रमानंतर मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते. कर्नाटक सरकारने काल घेतलेले हे निर्णय तसेच धर्मांतरण विरोधी कायदा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय, याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) नेते महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्नच्या (Karnataka Pattern) चर्चा करीत आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे की, हाच तो कर्नाटक पॅटर्न आहे का? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले, तेच आता वीर सावरकरांचा (Veer Savarkar) धडा काढायला निघाले, धर्मांतरण विरोधी कायदा (Anti Conversion Law) रद्द करतात, आता त्यावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय? अल्पसंख्यकांच्या अनुनयाला तुमची मान्यता आहे का? खुर्चीसाठी याहीबाबतीत समझोता करणार का, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.

दरम्यान, तुळजापूर येथे आई भवानीचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्याची संधी मिळणे हा अभूतपूर्व योग असतो. आज आईचे दर्शन घेतले. हे शक्तीचे दैवत आहे. जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वातील आमच्या सरकारला आईने शक्ती द्यावी तसेच आईचे निस्सीम भक्त असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi) यांना देशाचे नेतृत्त्व करताना अधिक शक्ती द्यावी, अशीही प्रार्थना आपण यावेळी केली. धाराशिवमध्ये रेल्वेचा प्रकल्प होतो आहे. मंदिर विकास आराखड्यासाठी राज्य आणि केंद्राकडून निधी देणार, यात्रा अनुदानाबाबत सकारात्मक निर्णय घेणार, कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी (Krishna Marathwada Project) मान्यता यातून जिल्ह्याला मोठा लाभ मिळणार आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात कोण लढणार, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha election 2024) आमचे केंद्रीय बोर्ड निर्णय घेत असते. काही अडचणी आल्या तर मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून निर्णय करु. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ज्या पक्षाला लढविण्याची गरज असेल तसा निर्णय आम्ही घेऊ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here