@maharashtracity

कोरेगाव भिमा विकास आराखड्याचा धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

पुणे: कोरेगाव भिमा (Koregaon Bhima) येथे शौर्याचे प्रतिक म्हणून मोठी वास्तू उभी करायची आहे, भावी पिढीला प्रेरणा मिळावी असे सुंदर स्मारक (memorial) येथे उभारण्यात यावे, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरेगाव भिमा येथील स्मारकाच्या विकासकामांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे आदी उपस्थित होते.

श्री.मुंडे म्हणाले, शासनाने हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. जागेची अडचण दूर झाल्यानंतर या कामाला वेग देता येईल. त्यामुळे कायदेशीर बाबींसाठी तज्ज्ञांचे सहकार्य घेण्यात यावे. विविध देशात पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून अशी स्मारके उभारून त्यांचे जतन करण्यात येते. त्याच धर्तीवर सुंदर आणि त्या काळातील स्मृतींना उजाळा देणारे स्मारक उभारावे.

या परिसरात कायमस्वरूपी वाहनतळ, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृह आदी कायमस्वरूपी सुविधा निर्माण करण्याचा विचार व्हावा. स्मारकाच्या आराखड्यासाठी संकल्पना स्पर्धा घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येतील असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here