अन्यथा कारवाई होणार – मुंडेंचा इशारा

@maharashtracity

मुंबई: चेंबूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, 1000 क्षमतेचे मुला- मुलींचे वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे बांधकाम संबंधित विकासकाने तीन महिन्याच्या आत पूर्ण करून सामाजिक न्याय विभागाकडे या इमारती हस्तांतरीत कराव्यात, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिले.

१२ वर्षापासून रखडलेल्या चेंबूर येथील 1000 मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृह (Hostel) बांधकामाची पाहणी व आढावा बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते.

चेंबूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, 750 क्षमतेचे मुलांचे व 250 क्षमतेचे मुलींचे वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था याचे बांधकाम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम बीओटी (BOT) तत्वावर करत आहे. ज्या विकासकाडून काम केले जात आहे त्यांना वेळोवेळी मुदतवाढ देवूनही काम वेळेत पूर्ण केलेले नाही. हे काम तीन महिन्याचा आत पूर्ण न झाल्यास शासनाच्या निर्देशाप्रमाणे विकासकावर दंडात्मक कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी, असे स्पष्ट निर्देश मुंडे यांनी दिले.

सामाजिक न्याय विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला आतापर्यंत विविध बांधकामासाठी निधी दिला आहे. ब-याच ठिकाणी राज्यात कामे अपुरी आहेत असे निदर्शनास आले आहे. सामाजिक न्याय विभागाची राज्यातील प्रलंबित बांधकामाची सद्यस्थिती कळावी व त्यावरती तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी एक बैठक घेणे अत्यंत आवश्यक आहे; ही बैठक तात्काळ लावण्यात यावी, असेही निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले.

मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, या जागेत संत एकनाथ मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहाबाबत विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होवू देणार नसून या वसतीगृहाच्या विकासाबाबतही योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आज विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी शिक्षण घेत असताना वसतीगृहांची अत्यंत आवश्यकता आहे. वसतीगृहांची संख्या कमी असून प्रवेशासाठी अर्जांची संख्या जास्त असते. त्यामुळे वसतीगृहाचे काम लवकर पूर्ण करावे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) काम अथवा वसतीगृहाची कामे नियोजित आराखडयानुसार होणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कामामधील त्रुटी ठेवू नयेत असेही मुंडे यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here