@maharashtracity
धुळे: जिल्हा परिषदेच्या १४ गट आणि पंचायत समितीच्या २८ गणांसाठी आज मंगळवारी ५५२ केंद्रावर सकाळी ७.३० वाजेपासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. .या पोटनिवडणुकीत दुपारी 3.30 वाजेपर्यंत 46.37% मतदान झाले. 4 वाजेनंतर मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या त्यामुळे अनेक ठिकाणी मतदान 6 वाजेनंतर सुध्दा सुरू होते. सरासरी 50 टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. (Average 46.37 per cent voting in Dhule ZP by-election)
या पोटनिवडणुकीत यात प्रामुख्याने भाजप विरुध्द काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी महाआघाडीत लढत होत आहे. सकाळी ९.३० वाजेपर्यत पहिल्या टप्प्यात एकुण ९.७४ टक्के तर दुपारी ११.३० पर्यंत २२.२७ टक्के मतदान झाले होते.
धुळे जिल्ह्यात १५ गट आणि ३० गणांसाठी पोटनिवडणुक होत असून यात माघारीअंती धुळे तालुक्यातील बोरकुंड गटात शिवसेनेच्या शालीनी बाळासाहेब भदाणे या बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे १४ गटांसाठी तसेच शिरपूर तालुक्यातील विखरण गणातून विनिता मोहन पाटील आणि करवंद गणातून यतीश सुनिल सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याने २८ गणांसाठी मतदान झाले.
Also Read: धुळे-नंदुरबार मध्ये ओला दुष्काळ जाहीर करा – आमदार अमरीश पटेल
१४ गटासाठी ४२ तर २८ गणांसाठी ७२ असे एकूण ११४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात सर्वाधिक १० जिल्हापरिषद गट धुळे तालुक्यातील आणि ४ गट शिंदखेडा तालुक्यातील आहेत.
पंचायत समितीचे धुळे तालुक्यात ८ शिरपूर तालुक्यात ६, शिंदखेडा तालुक्यात ५ आणि साक्री तालुक्यात ९ गणांमध्ये निवडणुक होत आहे. धुळे तालुक्यात सर्वाधिक २३६, त्या खालोखाल शिंदखेडा तालुक्यात १५६ शिरपूरमध्ये ६३ तर साक्री तालुक्यात ९७ केंद्र आहेत.
सर्व केंद्रावर मिळून एकूण ३ हजार २४५ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. अद्याप तरी कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.
तसेच धुळे तालुक्यात निवडणुकीसाठी २ सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले. यात फागणे गट येथील सखी मतदान केंद्र जि प मुलांची शाळा फागणे येथे असून सखी मतदान केंद्रावर अध्यक्ष श्रीमती छाया काळे, भारती भदाणे, श्रीमती वर्षा सावंत, रत्नाप्रभा सूर्यवंशी, शिपाई पुष्प खंडाळे पोलीस होमगार्ड सपना पवार यांची नियुक्ती केली होती.
तसेच गट नगाव येथील सखी मतदान केंद्रावर एकूण १०५३ मतदार आहेत. येथे मतदान केंद्र अध्यक्ष श्रीमती राजपूत तर मतदान अधिकारी सुमन साळुंके, प्रतिभा साळुंके, अरुण पवार, विना सोनवणे तसेच पोलीस कर्मचारी इला गावित यांची नियुक्ती करण्यात आली होती. बुधवार दि 6 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.
पोटनिवडणुकित 63 टक्के मतदान
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदांतील 84; तर त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील 141 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 63 टक्के मतदान झाले.
प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी: धुळे- 60, नंदुरबार- 65, अकोला- 63, वाशीम- 65, नागपूर- 60 आणि पालघर- 65. एकूण सरासरी- 63.