नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुंबई – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत अवमानकारक वक्तव्य करणारे अहमदनगर महापालिकेचे तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्याबाबतचे आदेश नगरविकास विभागाने प्रसिद्ध केले आहेत.

छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर अहमदनगर महापालिकेने २६ फेब्रुवारी २०१८ रोजी विशेष सभा घेऊन त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव मंजूर केला होता. हा ठराव महापालिका आयुक्तांनी राज्य शासनाला मंजुरीसाठी ९ मार्च २०१८ रोजी सादर केला होता. हा अहवाल आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १३ (१) (अ) मधील तरतुदींनुसार छिंदम यांना नोटिस बजावण्यात येऊन बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. तसेच, तत्कालीन राज्यमंत्री, नगरविकास यांच्याकडे १७ ऑक्टोबर २०१८, ५ ऑगस्ट २०१९ आणि २२ ऑगस्ट २०१९ रोजी सुनावण्या झाल्या. परंतु, त्यावर काहीही निर्णय झाला नाही.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गुरुवार २७ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु, प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहाण्यास नकार दर्शवत छिंदम यांनी यापूर्वी सादर केलेले म्हणणे ग्राह्य धरण्याची विनंती केली होती. त्यानुसार, एकनाथ शिंदे यांनी महापालिकेचा ठराव, आयुक्तांनी वेळोवेळी सादर केलेले अहवाल आणि आजवर अवलंब केलेल्या प्रक्रियेचा विचार करून छिंदम यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here