@maharashtracity

मुंबई: मुंबईतील खड्ड्यांच्या समस्येवरून भाजप पक्ष आक्रमक झाला आहे. मुंबई महापालिका मुख्यालयासमोर भाजपातर्फे ‘सेल्फी विथ खड्डा’ (Selfie with potholes) स्पर्धा २०२१ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

तर अंधेरी, एमआयडीसी मध्ये ‘खड्डे’ या विषयावर भाजपा युवा मोर्चा तर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी, पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केल्याने अनेक आंदोलकांचे कपडे फाडले व त्यांना जबर मार लागला.

या पोलीस कारवाईची गंभीर दखल घेऊन भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी, ‘मुख्यमंत्री महोदय, जनतेच्या प्रश्नांवर लोकशाही मार्गाने अंहिसेच्या आंदोलनाला पोलिसांकडून असेच चिरडणार असाल तर यापुढे मंत्रालयात लाठ्याकाठ्या घेऊन आंदोलने करायची का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

भाजपातर्फे ‘सेल्फी विथ खड्डा’ स्पर्धा २०२१ चे प्रदर्शनं मुंबई महापालिका मुख्यालयाच्या समोरील प्रांगणात शनिवारी करण्यात आले होते. याचे उद्घाटन आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी गंगुबाई गर्जे या महिलेला खड्डयाची चांगली सेल्फी काढल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी, भाजपचे राज पुरोहित, नगरसेवक आकाश पुरोहित, आशा ताई मराठे, महादेव शिवगण, कृष्णवेणी रेड्डी व दक्षिण मुंबई- मध्य दक्षिण जिल्ह्याचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारचे प्रदर्शन मुंबईतील सर्व पालिका वार्ड ऑफिसच्या बाहेर लवकरच भरविण्यात येणार आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी सांगितले.

आंदोलनकर्त्यांवरील लाठीचार्जच्या (lathi charge on protestors) घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करीत आमदार आशिष शेलार यांनी, पोलीस कारवाईचा निषेध व्यक्त केला. शिवसेनेने (Shiv Sena) हे सर्व थाबंवावे. बेकायदेशीर आणि चुकीचे वागणारे राज्याचे गृहमंत्री असले तरी ते आज फरार आहेत, हे विसरू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here