Twitter: @maharashtracity

मुंबई: विधान परिषदेत कोणी अज्ञात व्यक्ती शिरल्याची बाब सदस्य अमोल मिटकरी यांनी शुक्रवारी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या लक्षात आणून दिली. मात्र सोमवारी यावर गोऱ्हे यांनी स्पष्टीकरण देत ते सदस्य सभागृहातीलच असून सदस्य मिटकरी यांनी न ओळखल्याने गफलत झाल्याचे सांगितले. दरम्यान, सभागृहाची सुरक्षा चांगली असून अनावधानाने हि घटना घडल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. 

जेवणाच्या सुटीनंतर सभागृह सुरु झाल्यावर सदस्य जयंत पाटील यांनी शुक्रवारी अज्ञात व्यक्ती आली असल्याचा मुद्दा सोमवारी उपस्थित करत पास बंद केल्याचे सांगितले. तर गोऱ्हे यांनी मर्यादित पास द्यावे असं ठरलं असताना प्रमाणाबाहेर पासची मागणी वाढली असे नमूद करतानाच सध्या आवश्यक असलेले पीए तसेच सचिव यांचे पास बंद न केल्याचे गोऱ्हे यांनी सभागृहाला सांगितले.  

यावर सदस्य शशिकांत शिंदे यांनी विधीमंडळ आवारात मोठी गर्दी होत असल्याचे सांगत मुर्त्या घेऊन आवारात काही लोक शिरल्याचे सांगितले. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी पासला बंधन घालण्याच्या मुद्द्याला पाठिंबा दिला. अमोल मिटकरी यांनी शुक्रवारी निळा शर्ट, डोक्याला टिळा लावलेली अज्ञात व्यक्ती सभागृहात असल्याची चिट्ठी उपसभापती यांना पाठवली. यावरून सभागृहाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच त्या व्यक्तीचे फुटेज वाहिन्यांनी प्रसारित केले. मात्र, ते सभागृहाचे सदस्य रमेश कराड असून त्यांना मिटकरी यांनी ओळखले नसल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. सभागृहाची सुरक्षा यंत्रणा सुरक्षा यंत्रणा चोख असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगत गोऱ्हे यांनी ती घटना निकालात काढली. मात्र मीडियाकडे जाण्याची घाई कशासाठी असा सवाल भाजपचे प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here