@maharashtracity

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार मनमानी व हुकूमशाहीपद्धतीने काम करत असून विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करत आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही राजकीय सूडभावनेने पाठवलेली आहे. भाजपाच्या अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही, त्यांच्या अशा कारवायांना सडेतोड उत्तर देऊ, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीची नोटीस ही राजकीय द्वेषातून पाठवलेली आहे. या प्रकरणात एका पैशाचाही गैरव्यवहार झालेला नसून नॅशनल हेरॉल्डशी संबंधित कोणत्याही संचालकाला लाभांश अथवा पैसे मिळालेले नाहीत. हा सर्व व्यवहार पूर्ण पारदर्शक आहे.

कसल्याही प्रकारच्या चल-अचल संपत्तीचे हस्तांतरण झालेले नाही व कोणालाही लाभ झालेला नसताना मनी लाँडरिंगचा गुन्हा कसा होतो ? २०१५ साली बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे केवळ गांधी कुटुंबाला नाहक त्रास देण्याचा प्रकार आहे.

मोदी सरकार जाणीवपूर्वक काँग्रेस नेतृत्वाची छळवणूक करत आहे. सोनियाजी गांधी यांना २१ जुलैला हजर राहण्याचे पाठवलेले ईडीचे समन्स हे राजकीय सूडभावनेतूनच आहे.

काँग्रेसला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न काँग्रेस पक्ष यापुढेही हाती घेऊन मोदी सरकारला जाब विचारत राहिल.

सोनियाजी यांच्या आधी खा. राहुलजी गांधी यांनाही ईडीने पाच दिवस दररोज चौकशीच्या नावाखाली ईडी कार्यालयात १०-१० तास बसवून त्यांचा छळ केला.

ईडीसारख्या सरकारी संस्था मोदी सरकारच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. काँग्रेस पक्ष कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, त्याचा लोकशाहीमार्गाने व कायद्याच्या माध्यमातून उत्तर दिले जाईलच पण काँग्रेस नेतृत्वाला राजकीय सुडभावनेने नाहक त्रास दिला जात आहे हे खपवून घेतले जाणार नाही.

अशा सूडभावनेच्या कारवाईचा काँग्रेस पक्ष निषेध करत असून वेळ पडली तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू असा इशारा पटोले यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here