@maharashtracity

धुळे: धुळे महानगर (Dhule Municipal Corporation) पालिकेत अधिकारी व पदाधिकार्‍यांनी मिळून जनतेच्या पैशांची उघडपणे लुट सुरू केली आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शहराचे आमदार फारूक शाह (MIM MLA Faruk Shah) यांनी बुधवारी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले.

आ. फारूक शाह यांनी सांगितले की, धुळे महानगर पालिकेत कचरा संकलन करणार्‍या वॉटरग्रेस कंपनीसह इतर ठेकेदारांची प्रलंबित बीले काढताना कोविड-19 च्या (covid-19) शासन आदेशाची सर्रास पायमल्ली करून केवळ टक्केवारीवर ही बीले देण्यात आली.

संबंधितांची बीले अदा करूनही यासाठी नागरिकांसह शिवसेना (Shiv Sena) व मनसेच्या (MNS) तक्रारीची दखल घेत शासनाने 4 मे 2020 रोजी स्पष्ट आदेश दिलेला असतानाही ही बीले अदा झाल्याने 1 मार्च 2020 पासून आजतागायत महापालिका (DMC) निधीतून देण्यात आलेल्या बिलांची चौकशी करण्यात यावी.

तसेच कोरोना काळात (corona pandemic) शहरातील कंटेनमेंट झोनसाठी लागणारी सामुग्री (पत्रे, बांबु) पुरवठ्याची निविदा काढताना कोट्यवधी रूपयांची अफरातफर झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षातील कारभाराची चौकशी करण्याकरीता समिती नेमावी व या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या मनपा अधिकारी व पदाधिकार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी आ. फारूक शाह यांनी केली.

त्यावर लवकरच संपुर्ण भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचे ना.एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here