कारवाई न झाल्यास सर्व शासकीय कार्यलयांमध्ये संप करणार
Twitter : @maharashtracity
मुंबई: महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे नेते आणि दि महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला तसेच सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद चव्हाण यांचा गळा दाबून ठार करण्याचा कट करणारे व वरिष्ठ महिला अधिकारी यांना लज्जा वाटेल अशा शब्दांत शिवीगाळ व अपशब्द वापरल्याप्रकरणी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व कार्यालयांमध्ये तृतीयश्रेणी, चतुर्थश्रेणी व परिचारिका वर्गातील कर्मचा-यांनी दुपारी तीव्र निदर्शने केली. यानंतरही कारवाई न झाल्यास सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संप करून कामकाज बंद करण्याचा आणि त्याची सर्व जबाबदारी शासनाची राहिल, असा इशाराही कर्मचा-यांनी दिला आहे.
राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने मुंबईत कामा रुग्णालयात ही निदर्शने करण्यात आली. तर अन्यत्र महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये कर्मचा-यांनी निदर्शने करून संताप व्यक्त केला. आनंदराव अडसूळ यांनी भाऊसाहेब पठाण यांच्यावर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. त्यांचे साथीदार समीर तुळसकर आणि भगवान पाटील हेही त्यात सहभागी होते, असा या आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे.
आनंदराव अडसूळ यांच्या युनियनच्या सभासदांची वर्गणी सोसायटीने भरावी, ही नियमाबाह्य कृती करण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी हा हल्ला केला. तसेच दोन कर्मचा-यांना संचालक मंडळावर घेण्याच्या मागणीचा विचार सभासदांच्या बैठकीत करू, असे सांगितले असतानाही तसेच त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचे स्पष्टीकरण शांतपणे देत असतानाच त्यांनी जाणीवपूर्वक शिवीगाळ करत हा हल्ला केला. त्याचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध असून तो पोलिसांना दिले आहे. त्याचबरोबर रीतसर तक्रारदेखील नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. असे असतानाही कारवाई करण्याबाबत पोलिस चालढकल करत आहेत, त्यामुळे कर्मचारी वर्गात संताप असून त्याचा उद्रेकदेखील होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे, असा दावा संघटनेने पत्रकाद्वारे केला आहे.
मुंबईतील निदर्शनात संघटनेचे कार्याध्यक्ष भिकू साळुंखे, कोषाध्यक्ष मार्तंड राक्षे, कार्यालयीन सचिव बाबा कदम तसेच प्रभारी सचिव वरेश कमाने यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी निदर्शने केली तसेच अडसूळ यांच्या अटकेसाठी घोषणाही दिल्या. दरम्यान, कारवाई न झाल्यास लवकरच संपाचे आंदोलन करण्याचा निर्धारदेखील कर्मचा-यांनी केला आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची राहिल, असा इशाराही देण्यात आला आहे.