By Sadanand Khopkar
Twitter: @maharashtracity
नागपूर: टीईटी परीक्षा संबंधिचा राखून ठेवलेला प्रश्न प्रश्नोत्तार यादीत नाही, जे महत्वाचे तेच प्रश्न वगळले आहेत असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासानंतर उपस्थित केला.
जे नियमात बसत नाही त्यावर चर्चा नाही असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बजावले. तेव्हा सभागृहात गदारोळ करीत अनेक विरोधी सदस्य उभे राहिले. ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी अनेक मंत्री, सदस्य यांचा टीईटी घोटाळ्यात सहभाग असल्याचे सांगून या निषेधार्थ सर्व विरोधी सदस्य सभात्याग करतो असे जाहीर केले.
सर्व विरोधी सदस्य सभागृहाबाहेर जात असताना ज्यांच्या काळात हा घोटाळा झाला तेच सभात्याग करीत आहेत, असा इतिहासातील हा पहिला विरोधी पक्ष असेल असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाणला. महाविकास आघाडी काळात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्र परीक्षेच्या भरती प्रक्रियेत अपात्र ठरवलेल्या आस्थापनांना पात्र करण्यात आल्यामुळेच हा घोटाळा झाला. हा घोटाळा मंत्रालयीन पातळीवर झाला आहे. तत्कालीन सरकारकाळात हे घडले. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करु, अशी घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
माजी मंत्री आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांनी २८ डिसेंबर या दिवशी सभागृहात माहिती विचारण्याच्या अधिकारात सभागृहात उपस्थित करून शिक्षक पात्र परीक्षेच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपात्र आस्थापनांना पात्र केले नसते, तर हा घोटाळा झाला नसता. या आस्थापनांना पात्र करण्याचा निर्णय कुणी दिला याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कन्येला कमिशनने अपात्र ठरविले, त्यामुळे तिला नोकरी मिळाली नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.