@maharashtracity

अंबादास दानवे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी

संभाजीनगर: महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यात मागील दोन-तीन दिवसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून अशावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने बचाव कार्य व तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे (Shiv Sena MLA Ambadas Danve) यांनी केली आहे.

याबाबत आमदार अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व पालकमंत्री सुभाष देसाई (Minister Subhash Desai) यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना अतिशीघ्रतेने मदत करावी व उपाययोजना राबवावी अशी मागणी केली आहे.

आमदार दानवे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे नुकसान झाले असून त्यांना तात्काळ शासनाच्या नियमानुसार पंचनामा न करता २ हेक्‍टरपर्यंत अनुदान देण्यात यावे.

पुरामुळे व अतिवृष्टीमुळे राहते घर पडलेल्यांना घरे बांधून देणे आवश्यक आहे. तसेच सिंचन विहिरी ही पडल्या आहेत, रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर बांधकाम दुरुस्ती करण्यात यावी. अतिवृष्टी झाल्याने विमा कंपन्यांनी पंचनामा न करता सर्व विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा मंजूर करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे.
पुरामुळे, अतिवृष्टीमुळे शासकीय इमारती, स्मशानभूमी शेड, पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक विहीर ,समाज मंदिरांची पडझड झाली आहे त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

पुरामुळे अतिवृष्टीमुळे रस्ते पूल वाहून गेलेले आहेत त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, अशा मागण्या आमदार दानवे यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here