uddhav

@maharashtracity

‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’आजाराने त्रस्त लहान मुलांना नवजीवन मिळणार
नायर रुग्णालयात ‘जिनोम सिक्वेंसिंग लॅब’ कार्यान्वित

मुंबई: कोरोना विषाणूूचा बदलता अवतार ओळखून त्यावर वेळीच उपचार शोधण्यासाठी ‘जिनोम सिक्वेंसिंग लॅब’ (Genome Sequencing Lab) उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्याला अधिक बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे, ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ यासारख्या दुर्मिळ आजाराने त्रस्त लहान मुलांकरिता आवश्यक उपचार सुविधा नायर रुग्णालयात उपलब्ध झाल्याने आजारी रुग्णांना नवजीवन मिळणार आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

मुंबई महापालिकेच्‍या नायर रुग्णालयाच्या शतकोत्तर महोत्सवाचा शुभारंभ बुधवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी, ‘जिनोम सिक्वेसिंग लॅब’ आणि ‘स्पिनराझा औषधोपचार’ प्रकल्पाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी, महापौर किशोरी पेडणेकर, आ. यामिनी जाधव, उप महापौर ॲड. सुहास वाडकर, विरोधी पक्षनेता रवी राजा, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, गटनेता श्रीमती राखी जाधव, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी,आयुक्त आय. एस.चहल, अतिरिक्‍त आयुुक्‍त सुुरेश काकाणी, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाची वाढ जिथे जिथे होते तिथल्या विषाणुला शोधून काढणे, त्याचे जनुकीय परिणाम शोधणे गरजेचे असते. नसता अनर्थ घडतो. जेवढा विषाणुचा प्रकार ओळखण्यास उशीर तितके त्याचे परिणाम समजून घेणेही कठीण असते, हे कोरोना विषाणुवरून आपणास दिसून आले आहे.

त्यामुळे मुंबईमध्ये सुरु झालेली ‘जिनोम सिकवेन्सींग लॅब’ स्थापन करण्याची इच्छा महापालिकेने पूर्ण करून दाखवली. अशा प्रकारची लॅब मुंबईमध्ये असणे गरजेचे होते. आजपासून ही लॅब कार्यरत होईल त्यामुळे कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ प्राप्त होईल. त्यासाठी शासन आणि महापालिकेवर आर्थिक भार न टाकता त्यांनी सीएसआर निधीतून हे काम केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले.

स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’आजाराने त्रस्त लहान मुलांना नवजीवन

‘स्पायनल म्स्क्युलर ॲट्रोफी’ सारख्या दुर्धर आजारापासून लहान मुलांना वाचवण्याची गरज आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च हा कोट्यवधीमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी वेदिका शिंदे या बालिकेचे याच आजाराने निधन झाले. तिला १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आले होते मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत.

भविष्यात या आजाराने लहान मुले दगावू नयेत म्हणून महापालिकेचे डॉक्टर्स अविरत प्रयत्न करत आहेत. त्यावरील औषध भारतात उपलब्ध करण्याची गरज आहे. आजपासून नायर रुग्णालयात ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरावर उपचाराची सुविधा निर्माण झाली आहे.

अमेरिकास्थित संस्थेच्या माध्यमातून या आजारावर प्रभावी असणारे महागडे इंजेक्शन रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार असून सध्या नायर रुग्णालयातील १७ रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here