By सदानंद खोपकर
Twitter: @maharashtracity
नागपूर: आता आपले सरकार आले आहे. मुंबईकरांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी हे कट्टीबद्ध आहोत. मुंबई महानगरपालिका अंतर्गत सर्व रुग्णालयांतील सर्व प्रकारच्या सुविधा व समस्यांचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नियुक्त करू. काही अनियमितता असतील तर चौकशी केली जाईल. ५५०० आशा सेविकांद्वारे मुंबईतील आरोग्यसेवांचे सर्वेक्षण करण्यात येईल, असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका प्रश्नोत्तर दिले.
कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालयांतील सोयी सुविधांमध्ये सुधारणा व्हावी असा प्रश्न भाजप सदस्य आशिष शेलार यांनी विरोधी पक्ष सदस्यांच्या गदारोळातच उपस्थित केला होता. सेव्हन हिल्स रुग्णालय ताब्यात घेऊन सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी केली. उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, यापूर्वीच्या सरकारने आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मुंबईतील रुग्णालयांची अशी स्थिती झाली आहे. आता या प्रश्नाकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देऊ.
ते म्हणाले, डॉक्टरांची रिक्तपदे, यंत्रसामुग्रीची अनुपलब्धता याबाबत उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा करु. ज्या रुग्णालयांमध्ये औषध खरेदीत दिरंगाई होत आहे, त्याची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येईल. यापुढे मुंबईतील रुग्णालयांमध्ये वेळेत औषधे मिळतील. तसेच सेव्हन हिल रुग्णालयाबाबत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.