Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना ईडीची नोटीस विषयावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ’कोरोना काळात डॉक्टर आणि परिचारिका घाबरुन पळ काढत असताना‘ असे वादग्रस्त वक्तव्य केले. राऊत यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यातील डॉक्टर नाराज झाले आहेत. राऊत यांनी जाहिर माफी मागावी अन्यथा डॉक्टर आंदोलन करतील, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेकडून देण्यात आला आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे म्हणाले की, कोविडच्या काळात या आजाराशी लढण्यासाठी डॉक्टर, परिचारिका इत्यादी आरोग्य सेवा कर्मचारी आघाडीवर होते. आरोग्य सेवेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत रुग्ण सेवा केली. तसेच कित्येक डॉक्टर आणि परिचारिकांचा कोविड रुग्णसेवा करताना जीव गेला. असे असतानाही सरकारने आश्वासन देऊनही त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई दिलेली नाही.
यावर आयएमएचे सचिव डॉ. संतोष कदम यांनी सांगितले की, कोविडशी लढा देताना अनेक घरांचा आधारही गेला. तरीही आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांनी न डगमगता कोविड बाधितांवर उपचार सुरू ठेवले. अनेक राजकीय पक्षांनी, राज्यपाल आणि खाजगी संस्थांनी राज्यभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
असे असताना संजय राऊत यांनी केलेले विधान कोविड योद्ध्यांचा अपमान करणारे होते. त्यामुळे संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा आरोग्य कर्मचारी त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलने करणार असल्याचा इशारा दिला आहे.
राऊत यांच्याकडून असे वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. याआधीही त्यांनी उपचारासाठी डॉक्टरची गरज नसून कंपाउंडरची गरज असल्याचे म्हटले होते याची आठवण करुन दिली.