@vivekbhavsar

पहाटेचा शपथविधी हा केवळ महाराष्ट्र (Maharashtra) नव्हे तर देशाच्या राजकीय इतिहासातला चमत्कारिक पण फसलेला प्रयोग होता. काय करू नये, याचा मोठा धडा हा प्रयोग शिकवून गेला. त्याची पुनरावृत्ती त्याच स्वरूपात होणे शक्य नाही. पण त्याचा आधुनिक अवतार म्हणता येईल अशा स्वरूपाचा महाराष्ट्र राज्यात पुन्हा अनपेक्षित राजकीय भूकंप होऊ शकेल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

आपण जेव्हा अगदी comfort zone मध्ये असतो आणि आता सरकारमध्ये किंवा सरकारबाबत काहीही होणार नाही, अशा ठाम विश्वासात असतो, किंवा अगदी खाजगी आयुष्यात ही निर्धास्त असतो, तेव्हाच काहीतरी अघटित आणि अनपेक्षित घडते आणि आपल्याला धक्का बसतो.

महाविकास आघाडी सरकार (MVA) येणार हे निश्चित झाले होते, खातेवाटप निश्चित झाले होते आणि अचानक पहाटे शपथविधी झाला, सगळेच हादरले होते. ANI ज्या पत्रकाराला पहाटे उठवून राजभवनला नेले गेले, त्यालाही शपथ सुरू होईपर्यंत काहीही पत्ता लागू दिला गेला नाही.

आताही सगळे राज्य आणि जनता गाफील आहे. तिला माहीत आहे, सरकार पडत नाही यातून भाजप (BJP) बेचैन आहे. पक्षाला व्हिटॅमिन एम पुरविणारे एकमेव राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि या राज्यातील सरकारमधून बाहेर पडणे म्हणजे पायावर दगड मारून घेणे आहे, याची पुरेपूर कल्पना असल्याने अवमान सहन करूनही काँग्रेस (Congress) या सरकारमधून बाहेर पडणार नाही.

राष्ट्रवादी (NCP) तर खऱ्या अर्थाने सत्तेचा उपभोग घेत आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे (Shiv Sena) असले तरी सर्वाधिक विकासनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मिळत आहे. अगदी 2014-19 या कालावधीत भाजप-शिवसेना युतीचे सरकार असतांनाही सत्ताधारी सेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी मिळाला होता.

अशा परिस्थितीत सत्ता आणि मुक्त अधिकार सोडून राष्ट्रवादी भाजपसोबत संग करेल याची सुतराम शक्यता नाही.

असे सगळे आलबेल असतांना म्हणजे comfort zone मध्ये असतांना राज्यात काही राजकीय भूकंप घडेल याची अजीबात शक्यता नाही, असे चित्र तयार झाले आहे किंवा केले गेले आहे. जेव्हा केव्हा अशी परिस्थिती असते, तेव्हाच काहीतरी अनपेक्षित घडत असते. मला वाटते ती वेळ जवळ आलेली आहे.

निमित्त आहे, सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची प्रकृती. जेव्हा तुम्ही काही लपवता तेव्हा संशय बळावतो आणि असत्य किंवा अपूर्ण माहिती ही अफवेच्या स्वरूपात वाऱ्याचे वेगाने पसरते. नेमके हेच उद्धव ठाकरे यांच्याबाबत घडले आहे.

मुळातच उद्धव ठाकरे यांना मीडिया (media) आणि पत्रकारांचे वावडे. पत्रकारांना टाळणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम. अर्थात काही पत्रकारांचा त्यांना अत्यंत वाईट अनुभव आलेला आहे, हे मान्य. पण, म्हणून सगळी पत्रकार जमात वाईट ठरत नाही. पण, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असा हा न सुटणारा प्रश्न आहे.

उद्धवजी लवकर स्वस्थ व्हावे आणि ‘वर्षा’ किंवा ‘मातोश्री’ येथून पुन्हा पूर्वीसारखे कामाला लागावे, हीच या राज्याचा नागरिक म्हणून प्रार्थना आहे. पण, समजा दीर्घकालीन उपाययोजना म्हणून त्यांना खूप जास्त महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असेल तर?

Also Read: ‘आशर – प्रशांत’ चे गॉडफादर एकनाथ शिंदेंवर कारवाईची हिम्मत दाखवावी – राष्ट्रवादी

तर त्यांनी उगाच धाडस करून स्वतःला कामाला जुंपून घेऊ नये. स्वर्गीय मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) होण्याची तर अजिबात गरज नाही. मी स्वस्थ आहे आणि अशा परिस्थितीत देखील काम करू शकतो, हे ‘दाखवणे’ खूप महाग पडू शकते. या राज्याला तुमची गरज आहे.

पण मग पर्याय काय? पर्याय असेल आदित्य ठाकरे.. हो आदित्य…

उद्धव ठाकरे यांना प्रकृती कारणास्तव राजीनामा द्यावा लागला तर पुढचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच (Aaditya Thackeray) असू शकतील. आमचे ठरले आहे, हे मी म्हटले ते यासाठीच. सरकार महाविकासचेच असेल, फक्त मुख्यमंत्री बदलतील. या नावावर आघाडीतील तीनही पक्ष नेत्यांचे एकमत झाले असल्याची पक्की माहिती आहे. कदाचित त्यासाठीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेऊन त्यांना राजी केले गेले असेल.

आदित्यबद्दल अधिकारीवर्गात खूप चांगले मत आहे. आदित्य हे नम्र, नवीन शिकण्याची तयारी असलेले, ज्येष्ठ नेते आणि अधिकारी यांचा सन्मान करणारे, असे मंत्री असल्याची सनदी अधिकाऱ्यांची भावना आहे. त्यामुळे या वर्गाकडून आदित्य ठाकरे यांना पुरेपूर सहकार्य मिळेल यात काही शंका नाही.

अन्य पक्षातील ज्येष्ठ मंत्री, ज्यांच्या तीन ते पाच टर्म झालेल्या आहेत, ते तरुण आणि पहिली टर्म असलेल्या आदित्य यांच्या नेतृवाखाली काम करतील का? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. ते करतील, सत्ता कायम राहणार असेल तर सगळे मान्य करतील.

एखाद्या दिवशी तिन्ही पक्षाचे मुख्य नेते आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन राजभावनकडे (Raj Bhavan) निघतील आणि ते तिथे पोहोचण्याचा बेतात असतांना राजभवनला fax असेल तर फॅक्स वर किंवा प्रत्यक्ष जाऊन कोणीतरी यद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचे पत्र सादर करतील.

माननीय राज्यपाल यांना विचार करायला वेळही न देता महाविकास आघाडीचे नेते आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देतील. अशा वेळी याच महाविकास आघाडीला सरकार स्थापन करण्यास आमंत्रण देण्यावाचून महनीय राज्यपाल यांना पर्याय राहणार नाही, अशी कोंडी करतील.

ही फँटसी वाटत असली तरी हे होऊ शकते आणि अगदी कधीही! तुम्ही आंम्ही गाफील असू अशा वेळी ही घटना घडू शकेल.

  • विवेक भावसार
    संपादक
    Maharashtracity
    मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here