विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

@maharashtracity

मुंबई: स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान हा मिळायलाच हवा. मात्र, आज सत्ताधारी हे वेगवेगळ्या कामात गुंतले आहेत. त्यांना जनतेशी देणेघेणे नाही. त्यामुळे त्यांना गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे पाल्य यांनाही भेटण्यासाठी वेळ नसणे हे वेदनादायी असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक (Freedom fighter) तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी व पाल्य विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे LoP Ambadas Danve) यांनी आज आझाद मैदान येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक तक्रार निवारण समितीच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याशी चर्चा करणार असून या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार असल्याचा शब्द अंबादास दानवे यांनी उपोषणकर्त्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पाल्यांना दिला.

सरकारच्या वतीने मंत्री किंवा प्रतिनिधी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी आले असते तर आज त्यांना उपोषणाची वेळ आली नसती, असा टोला दानवे यांनी लगावला. तुम्ही जर असमाधानी असलात तर शासनकर्ते सुद्धा समाधानी राहू शकत नाही. तुमचे समाधान व्हावे यासाठी सरकारने मागण्या मान्य केल्याच पाहिजे, असे दानवे यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पाल्यांना संबोधताना म्हटले.

आज आपण अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत आहोत. हैद्राबाद संग्रामालाही (Hyderabad Sangram) यंदा 75 वर्ष पूर्ण होणार आहे. हे दोन्ही संग्राम महत्त्वाचे आहेत.
ज्यांच्यामुळे आज स्वातंत्र्य मिळाले ते पारतंत्र्यात असताना, त्याचा उपभोग घेणारे समाधानी कसे राहू शकतात, असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

केंद्र व राज्य सरकार त्यांचे कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांच्यासाठी विविध योजना जाहीर करताना त्याचा आदेश १ एप्रिल पासून लागू करतात. मग या स्वातंत्र्य सैनिकांची मंजूर झालेली गौरव पेन्शन योजना ही पूर्व लक्षी प्रभावीपणे जारी केल्याप्रमाणे का नाही? असा प्रश्न उपस्थित करत दानवे म्हणाले की, समितीची मागणी योग्य आहे, ती मान्य करण्यासाठी सरकारची इच्छा शक्ती असणे आवश्यक आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष वसंतराव काकासाहेब देशमुख, बाळासाहेब चौंधे, शिवाजी साळुंके, दादाराव शिरसाठ, मारोती जाधव, स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे उपोषणकर्ते पाल्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here