आरोपी असलेला सदाभाऊ पुत्र बनला साक्षीदार
पॉंझी योजनेने घेतला पहिला बळी, संचालक अटकेत
सदभाऊंनी फेटाळले आरोप

कडकनाथ (kadaknath) कोंबडी पुरविण्याचा व्यवसाय करून किमान ८ हजार गुंतवणूकदारांची (investors) पाचशे कोटी रूपयांची फसवणूक करणाऱ्या रयत ऍग्रो (Rayat Agro) या पोंझी (Ponzi) योजनेने पन्हाळा तालुक्यात पहिला बळी घेतला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी आणि कंपनीचे संचालक सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते अटकेत आहेत. मात्र, माजी मंत्री सदाशिव खोत (Sadabbau Khot) यांचे पुत्र आणि रयत ऍग्रोचे ‘पाठीराखे’ सागर खोत (Sagar Khot) अजूनही बाहेर आहेत. सागर यांच्यावर कारवाई करावी आणि या योजनेच्या माध्यमातून फसवणूक झालेली रक्कम आणि गुंतवणूकदारांची संख्या पाहता हे प्रकरण आर्थिक गुन्हे अन्वेषण (EOW) विभागाकडे सोपवावे, अशी मागणी केली जात आहे.

रयत ऍग्रो प्रा ली या कंपनीच्या माध्यमातून कडकनाथ कोंबडी योजनेत गुंतवणूक करण्याची योजना आणणारा सुधीर शंकर मोहिते (Sudhir Mohite) आणि संदीप मोहिते (Sandeep Mohite) हे प्रमुख आरोपी असले तरी तत्कालीन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर खोत हे अजूनही बाहेर आहेत.

“सागर खोत हे सहाव्या क्रमांकाचे आरोपी असतांना अचानक असे काय घडले की त्यांना साक्षीदार करण्यात आले? खोत यांनी तपास यंत्रणेवर दबाव टाकला होता का? जास्त व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक स्वीकारणे हा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांचे उल्लंघन आहे. अशा असंख्य ‘पॉंझी’ योजना आल्यात आणि त्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉ किरीट सोमय्या यांनी अशा पोंझी योजनेच्या विरोधात आवाज उठवून सामान्य गुंतवणूकदारांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांनी आम्हालाही न्याय मिळवून द्यावा,” अशी अपेक्षा भागवत जाधव यांनी व्यक्त केली.

आरोपी संदीप मोहितेसोबत सदाभाऊ पुत्र सागर

जाधव हे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असून कडकनाथ प्रकरणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत.

सदाभाऊ खोत यांनी हे त्यांच्याविरूढ राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला असला तरी भागवत जाधव यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी पैकी संदीप मोहिते याचा विवाह सदाभाऊ खोत यांचे बंधू रंगराव विठू खोत यांची कन्या प्रियंका हिच्याशी दि 14 मे 2019 रोजी झाला, याकडे भागवत जाधव यांनी लक्ष वेधले.

“सुबोध आणि संदिप शेतकऱ्यांची कशी फसवणूक करत आहेत, याची कल्पना असतांना ही सदाभाऊ यांनी हा विवाह घडवून आणला, यातच सगळे आले,” असे जाधव म्हणाले. सदाभाऊ यांची संघटना रयत क्रांती संघटना आणि मोहिते यांच्या कडकनाथ व्यवसायचे नाव रयत ऍग्रो प्रा लि हे नावातील साम्य केवळ योगायोग असू शकत नाही, असे भागवत म्हणाले.

या प्रकरणाची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी व्हावी, सागर याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. सदाभाऊ खोत यांची राजकीय नौका आम्ही डुबवू आणि त्यासाठी सागर कारणीभूत असेल, असा दावा जाधव यांनी केला.

हीच ती लग्न पत्रिका ज्यात सदभाऊच्या पुतणीचे लग्न आरोपी संदीप याच्याशी झाल्याचे नमूद आहे. 

स्वाभिमानीकडून राजकीय आरोप – सदाभाऊ

आरोपीसोबत पुतणीचे लग्न लावून दिले या आरोपात काही तथ्य नाही. मला भाऊच नाही तर पुतणी कुठून येणार? गावात सगळे खोत आहेत. मी मंत्री होतो, त्यामुळे पत्रिकेत माझी पुतणी असा उल्लेख केला,” असा खुलासा सदाभाऊ खोत यांनी केला.

सागर आरोपी असल्याच्या आरोपवर सदाभाऊ यांनी स्पष्टीकरण दिले नाही, मात्र सागर याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले. “माझी संघटना स्थापन होण्याच्या आधीपासून रयत ऍग्रो स्थापन झाली होती. मोहिते याच्या रयत नावाच्या एक नाही तर सहा-सात कंपन्या आहेत,” असे सदाभाऊ खोत म्हणाले. राजू शेट्टी Raju Shetti) आणि त्यांची स्वाभिमानी (Swabhimani) संघटना आपल्यावर राजकीय हेतूने आरोप करत असल्याचा दावा सदाभाऊ यांनी केला.

 रयत ऍग्रो प्रा ली चे कार्यालय

दरम्यान, कडकनाथ घोटाळ्याचा (Kadaknath Scam) पहिला बळी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात गेला आहे. प्रमोद जमदाडे (Pramod Jamdade) असं या तरुणाचे नाव आहे. प्रमोद यांनी कडकनाथ कोंबडी पालनासाठी अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. प्रमोद जमदाडे याने रयत ऍग्रोच्या गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी उभ्या केलेल्या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला होता. प्रमोद जमदाडे यांना रयत ऍग्रो संस्थेकडे अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केल्याने नैराश आले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला, असा दावा केला जात आहे. जमदाडे याच्यावर आधीचेही कर्ज होते, असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here