@maharashtracity
अंबाजोगाई: धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात दौरा करत असलेल्या भाजपच्या माजी खासदार किरीट सोमैय्या (Kirit Somaiya) यांची अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथे चांगलीच तारांबळ झालेली पाहायला मिळाली.
सोमैय्या हे जगमित्र कारखाना प्रकरणातील जमीन व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता काही भाजप (BJP) पदाधिकारी त्यांना विविध निवेदने देत होते. दोन शेतकऱ्यांनी त्यांना परळी येथील वैद्यनाथ कारखान्याचे (Sugar mill) हजारो शेतकऱ्यांच्या एफआरपीचे (FRP) पैसे गेल्या तीन ते चार वर्षांपासून थकवले असून याप्रकरणी शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशा आशयाचे निवेदन दिले.
यावर ते काही बोलणार याआधीच एका पदाधिकाऱ्याने त्यांना तो कारखाना भाजपच्याच एका माजी मंत्री असलेल्या मोठ्या नेत्यांच्या ताब्यात असल्याचे लक्षात आणून देताच सोमैय्यांनी तिथून काढता पाय घेतला.
सकाळी अंबाजोगाई (Ambajogai) येथे आल्यानंतर एका पत्रकाराने किरीट सोमैय्यांना ‘तुम्ही केवळ सरकार मधील मंत्र्यांवर बदनामीकारक आरोप करत आहात’ अशा प्रतिक्रिया येत असल्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी नंतर बोलू असे म्हणत तिथूनही काढता पाय घेतला होता.
एकंदरीत किरीट सोमैय्या यांनी गाजावाजा करत बीड (Beed) जिल्ह्यात प्रवेश केला असला तरी भाजपच्याच काही नेते मंडळींच्या भूतकाळातील कृत्यांमुळे त्यांना तोंडघशी पडावे लागत आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.