…तर १५ दिवसांनी पालिका बंगल्यावर कारवाई करणार

@maharashtracity

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी १५ दिवसांत स्वतःच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम हटवले नाही तर पालिका पुढे येऊन या बंगल्यावर कारवाई करेल, असा इशारा देणारी अंतिम नोटीस मुंबई महापालिकेने (BMC) राणे यांना बजावली आहे

वास्तविक, मुंबईसह महाराष्ट्रात भाजप (BJP) व शिवसेनेसह (Shiv Sena) महाविकास आघाडी (MVA) यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून आरोप – प्रत्यारोप आणि बिघाडी सुरू आहे. एकमेकांच्या मंत्री व नेत्यांवर भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले जात आहेत. यामध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या तक्रारीनुसार शिवसेनेचे मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या कोकणातील रिसॉर्टवर लवकरच कारवाई होणार आहे. तर दुसरीकडे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील बंगल्यावर अनधिकृत बांधकामाप्रकरणी पालिकेतर्फे कारवाईची टांगती तलवार आहे.

मंत्री राणे यांना यापूर्वीही बंगल्यातील अनधिकृत बांधकामाची पाहणी करायला येणार असल्याने बंगल्याची कागदपत्रे, आराखडा तयार ठेवण्याबाबत अगोदर नोटीस बजावण्यात आली होती. पालिकेचे पथक प्रथमतः बंगल्यावर पोहोचले असता त्यावेळी राणे कुटुंबीय बंगल्यात नव्हते. नंतर पुन्हा त्यांना आणखीन एक नोटीस पाठविण्यात आली होती.

त्यानंतर पुन्हा एकदा नोटीस पाठवून १५ दिवसांत स्वतःच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम हटवले नाही तर पालिका पुढे येऊन या बंगल्यावर कारवाई करेल, असा इशारा देणारी नोटीस पालिकेने राणे यांना बजावली होती. मात्र आता पुन्हा एकदा १६ मार्च रोजी अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. जर राणे यांनी स्वतः बंगल्यातील अनधिकृत बांधकाम न हटविल्यास पालिका स्वतः त्यावर कारवाई करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here