भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती

@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेसोबत आघाडी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस एका पायावर तयार आहे. काँग्रेस सोबत आली तर काँग्रेससह आणि काँग्रेस सोबत आली नाही तर काँग्रेसशिवाय शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होणार हे अटळ आहे.

यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निकटवर्तीय नेत्याने महाराष्ट्रसिटी च्या प्रतिनिधींनीशी बोलताना दिली.

मुंबई महापालिकेची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपणार आहे. नियमानुसार पाच वर्षांनी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२ होणे अपेक्षित आहे. मात्र मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे.

मुंबईत सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. तर तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनामय वातावरणात मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक होणार की नाही, याबाबत मुंबईकरांच्या मनात संभ्रम आहे.

कोरोनामुळे निवडणूक पुढे ढकलावी लागली तर पालिकेवर प्रशासक नेमावा लागणार आहे. निवडणूक झाली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती अटळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार
यांनीही मध्यंतरी शिवसेनेशी जुळवून घ्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केले होते.

राज्यातील शिवसेनेला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपच्या नेत्यांनी ज्या ज्या वेळी टार्गेट केले, टीकाटिपणी केली त्या त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्या त्या नेत्यांना रोखठोक उत्तरे दिली आहेत. तसेच, मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना ज्या वेळी अडचणीत सापडली त्या त्या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे व राज्यातील महाविकास आघाडीचे संस्थापक शरद पवार हे आपले वय व प्रकृती यांची तमा न बाळगता मदतीला धावून आले आहेत.

त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात युती अटळ आहे. काँग्रेसने जरी स्वबळाची भाषा चालवली असली तरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसची शेवटच्या क्षणापर्यन्त वाट पाहणार असून काँग्रेस सोबत आली तर ठीक अथवा कॉंग्रेसशिवाय शिवसेना व राष्ट्रवादी यांची आघाडी अटळ आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here