विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वेधले सभागृहाचे लक्ष

Twitter: @maharashtracity

मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रतीक असलेल्या बोधचिन्हाऐवजी मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवरील सरकारचे बोधचिन्ह, घोषवाक्यात बदल करण्यात आला असल्याकडे आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी तातडीच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले.

पूर्वी सरकारचे बोधचिन्ह नंदादीप व बाजूला कमळ असे होते, ते काढून मंत्रालयाची इमारत ठेवण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुद्रेवर हे बोधचिन्ह होतं. घोषवाक्य बदलण्याचे कारण काय असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. 

सरकारने १० जानेवारी २०२३ रोजी याबाबत परिपत्रक काढले आहे. या सर्व बदलाच्या मागे कोण आहे व जुन्या बोधचिन्हाला कोणाचा विरोध होता त्याची सरकारने माहिती द्यावी, अशी मागणी दानवे यांनी सरकारकडे केली. त्यावर यावर माहिती घेण्यात येईल असे शासनाकडून सांगण्यात आले.

जुन्या बोधचिन्हाबाबत माहिती

पूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रतीक असलेल्या बोधचिन्हात नंदादीप व त्याभोवती फुलली १६ कमळ होती. तर “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्व वंदिता महाराष्ट्रस्य राज्यस्य मुद्रा भद्राय राजते” असे संस्कृतमध्ये ब्रीद वाक्य होते. याचा अर्थ महाराष्ट्र राज्याच्या या मोहराची शान पहिल्या दिवसाच्या चंद्राप्रमाणे वाढत जाईल. हे जग पुजले जाईल आणि केवळ आपल्या लोकांच्या कल्याणासाठी चमकेल असा होतो.

१७ व्या शतकातील मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी वापरलेल्या राजमुद्रावर (Rajmudra) सापडलेल्या एका बोधवाक्यावर जुने बोधवाक्य आधारित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here