@maharashtracity

धुळे: राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रुमख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने जिल्ह्यातील शिवसेनेत खांदेपालट करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी आता डॉ. तुळशीराम गावित यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर हिलाल माळी व महेश मिस्तरी यांची सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच माजी स्थायी समिती सभापती सतिष महाले यांना पुन्हा महानगर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, नव्यांना पदे तर जुन्यांना डावलल्याने पक्षातील एका गटातून नाराजीचा सूर उमटत आहे. (loyalist Shivsainiks upset with new appointments)

शिवसेनेत पदाधिकार्‍यांची खांदेपालट व नवनियुक्त्या जाहीर करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढण्यास मोठी मदत होणार आहे. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने पक्ष बळकटीकरणासह पक्ष वाढीवर भर दिल्याचे चित्र आहे.

त्यानुसार पक्षाचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धुळे जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची खांदेपालट केली आहे. याबाबतची माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आली.

त्यानुसार विद्यमान जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यावर शिरपूर व शिंदखेडा विधानसभा मतदार संघाच्या सहसंपर्क प्रमुखपदी, तर त्यांच्या जागी जिल्हाप्रमुख म्हणून डॉ.तुळशीराम गावित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गावीत हे धुळे शहर, धुळे ग्रामीण व साक्री विधानसभा मतदार संघात पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. तर महेश मिस्तरी यांची धुळे शहर, धुळे ग्रामीण व साक्री विधानसभा मतदार संघाच्या सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महानगर प्रमुखपदी (धुळे महानगर, पूर्व) मनोज मोरे, तर माजी स्थायी समिती सभापती सतिष महाले यांची महानगर प्रमुखपदी (धुळे महानगर, पश्‍चिम) नियुक्ती करण्यात आली आहे.

जुन्यांना डावलल्याने नाराजीचा सूर!

दरम्यान, शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक, महानगर प्रमुख, शहर प्रमुख यांनी अजूनही पक्षात काम करुन आपली निष्ठा जपली आहे. त्यांनी नेहमीच पक्ष वाढीसह शिवसेनेचा आवाज बुलंद करण्यासाठी अंगावर अनेक केसेस घेतल्या आहेत. त्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरुन कुठलेही पद देण्यात आलेले नाही.

यामुळे त्यांच्यासह समर्थकांमध्ये डावलण्यात आल्याची भावना आहे. काहींनी तर संपूर्ण आयुष्य शिवसैनिक म्हणून घालवले, असेही पदाधिकारी आजही कुठल्याच पदावर नाहीत. यावेळेसही त्यांना कुठलेच पद देण्यात आलेले नाही.

शिवाय, शिवसेनेत निष्ठावंत आणि कट्टर, असे उभे दोन गट पडलेले असतानाही दोन्ही गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरेंना आपले दैवत मानून पक्षात काम करणे पसंत केले. त्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यावेळेस पदांपासून लांब ठेवण्यात आले आणि नव्याने पक्षात आलेल्यांना पदे वाटण्यात आल्याने शिवसेनेच्या एका गटातून नाराजीचा सूर उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here