By मिलिंद माने
औद्योगिक विकास महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
महाड (रायगड): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) एका खाजगी कंपनीच्या उद्घाटनासाठी शनिवार दि 8 रोजी महाड (Mahad) येथे हेलिकॉप्टरने येणार आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील (MIDC) खाजगी कंपनीला हेलिपॅडसह (Helipad) विकलेल्या जागेवरील हेलिपॅड तात्पुरते उपलब्ध करून देण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने केल्याने तेच हेलिपॅड पुन्हा एका दिवसापूरते उपलब्ध होणार आहे. मात्र, भविष्यात कोणी व्हीव्हीआयपी (VVIP) महाड येथे आल्यास हेलिकॉप्टर उतरवण्याची व्यवस्था कुठे करायची हा प्रश्न तसाच अनुत्तरीत राहिला आहे.
महाड औद्योगिक क्षेत्रातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये गेली अनेक वर्ष हेलीपॅड कार्यरत होते. मात्र ज्या जागेवर हे हेलिपॅड होते ती जागा ओरिएन्ट ऑरोमॅंटिक अँड सन्स लिमिटेड या खाजगी रासायनिक कंपनीला (Chemical Company) विकण्यात आली. यामुळे गेल्या काही महिन्यापासून या हेलीपॅडचा ताबा कंपनीकडे होता.
याठिकाणी कंपनीचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे कंपनी प्रशासनाने हेलिपॅडच्या जागी कंटेनर टाकून तात्पुरत्या स्वरूपातील कार्यालय उभे केले होते.
मात्र अस्ट्रोईड लाइफ सायन्सेस या कंपनीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शरद पवार हे महाड औद्योगिक क्षेत्रात येणार असल्याने येथील कंटेनर हटवण्यात आले आहे. पूर्वीचे हेलिपॅड पुन्हा खुले करून एकाच दिवसाकरिता या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्यात येणार आहे.
शरद पवार हे देशपातळीवरील नेतृत्व आहे. राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज नेत्यांमध्ये त्यांचे स्थान पहिल्या क्रमांकाचे आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने देखील महत्वाची काळजी स्थानिक प्रशासन घेत आहे.
Also Read: मुंबई मनपात शिवसेनेकडून यापुढे फक्त तरुणांना संधी?
जिथे हेलिपॅड आहे त्याठिकाणी कंपनीचे काम सुरु असून खाजगी कार्यालयाचे कंटेनरदेखील तिथेच ठेवले आहे. यामुळे स्थानिक महसूल प्रशासन, औद्योगिक विकास महामंडळ, आणि पोलीस प्रशासन याठिकाणी कायम लक्ष देवून आहेत.
दरम्यान, महाड औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र उभे राहणार होते. याठिकाणी भूमिगत विद्युत व्यवस्था, पदपथ, हेलिपॅड, दूरध्वनी, पाणीपुरवठा योजना, पोलीस चौकी, आदी कामांचा आणि सुविधांचा यामध्ये समावेश होता.
या क्षेत्राकरिता सन १९९९ पर्यंत जवळपास १३३२.४६ लक्ष खर्च करण्यात आला. हे हेलिपॅड गेली अनेक वर्ष वापरात आले. मात्र पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात शासनाने स्वारस्य न दाखवल्याने हे क्षेत्र ओसाडच राहिले आहे. यामुळे पंचतारांकितचा दर्जा शासनाने काढून घेतला.
“जी जागा ओरिएन्ट ऑरोमॅंटिक अँड सन्स लिमिटेड या खाजगी रासायनिक कंपनीला दिली आहे त्या जागेतच हे हेलिपॅड अस्तित्वात होते. यामुळे औद्योगिक विकास महामंडळाने हे हेलिपॅड या जागेसह वाटप केले आहे. यामुळे आता हेलिकॉप्टर उतरवण्यास देण्याचा अधिकार त्या कंपनीचा असल्याने त्यांच्याकडूनच आता परवानगी दिली गेली असावी.”
- माधव पाटील,
विभागीय कार्यालय,
महाड MIDC