@maharashtracity

रायगड, महाड:-  महाड (Mahad) शहराची स्वच्छता करण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (UD Minister Eknath Shinde) यांनी जाहीर केले. हा निधी पुढील दोन दिवसात वितरित करण्याबाबत त्यांनी जिल्ह्या प्रशासनाला आश्वस्त केले.  
महाड शहरात झालेल्या प्रलयंकारी पावसानंतर संपूर्ण शहराचे अतोनात नुकसान झाले आहे. या शहराला पुन्हा सावरण्यासाठी श्री. शिंदे यांनी शहरातील मदत केंद्राला भेट देऊन तातडीने आढावा बैठक घेतली. 

या बैठकीत शहराची स्वच्छता करून रोगराईपासून प्रतिबंधीत करण्यासाठी निधी मंजूर करण्यासोबतच शहर स्वच्छ करण्यासाठी लागणारी डीडीटी पावडर, डीटर्जंट आणि जंतूंनाशक खरेदी करावे, शहर स्वच्छ करण्यासाठी फायर ब्रिगेडची वाहने, शहरात घरे दुकाने याबाहेर साचलेला कचरा उचलण्यासाठी डंपर, जेसीबी भाडेतत्त्वावर घ्यावे, शहरात जागोजागी अडकलेली वाहने काढण्यासाठी हायड्रो क्रेन घ्याव्या असे निर्देशित केले. 

महाड शहरातील घरे, दुकाने यांना सावरण्यासाठी तातडीने शहरातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून मदत म्हणून घरटी ५ हजार रुपये तातडीने देण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनला दिले. 
शहरातील पुराचे पाणी २० फुटापर्यंत वाढल्याने संपूर्ण शहर पाण्याने वेढले गेले होते. त्यामुळे आता शहर स्वच्छ करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे या कामासाठी वेगवेगळ्या नगरपालिकांचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

याशिवाय ठाणे महानगरपालिकेने मदत म्हणून  ड्रेनेज स्वच्छ करणारे टँकर्स महाडला पाठवले आहेत. याशिवाय शहरातील गरजेपुरती वीजेची गरज पूर्ण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने तीन जनरेटर्स पाठवले आहेत. हे जनरेटर्स देखील आजच  स्थानिक प्रशासनाला सुपूर्त केले. 

याशिवाय शिवसेना वैद्यकीय मदत कशाच्या माध्यमातून वैद्यकीय पथकाचा कॅम्प शहरात उद्यापासून सुरू केला जाणार असून त्या माध्यमातून लोकांची तातडीने तपासणी करण्यात येईल असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. 

रोगराईचा शिरकाव होण्यापूर्वी लवकरात लवकर हे शहर स्वच्छ करण्यास प्राथमिकता असल्याने उद्यापासून  स्वच्छता मोहीम हाती घेऊन चार दिवसात महाड शहर पूर्णपणे स्वच्छ करावे असेही त्यांनी स्थानिक प्रशासनाला निर्देशित केलेले आहे.

बाधित गावांचे पुनर्वसन

महाड पोलादपूर (Mahad Poladpur) येथे झालेल्या पावसामुळे इथे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. शहराप्रमाणे आजूबाजूची ३० गावेही बाधित झालेली आहेत. त्यांना दिलासा देण्याचाही सरकार प्रयत्न करेल. तसेच महाड आणि आजूबाजूच्या गावातील वाहून गेलेल्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत बैठक घेऊन नक्की जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ असेही श्री. शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here