महापौरांकडून आरोप व सूचक वक्तव्य
यशवंत जाधव यांच्या घरावर कारवाई सुरू असताना महापौरांची भेट 

मुंबई

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजपकडून यंत्रणेचा चुकीचा वापर करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात धाडसत्र सुरू आहे. यंत्रणेच्या माध्यमातून सुडबुद्धीने कारवाई सुरू आहे. मुंबई, महाराष्ट्रातील वातावरण बिघडविण्याचा व शिवसेनेला डॅमेज करण्याचे त्यांचे षडयंत्र आहे, असे आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर केले आहेत.   

मात्र अशा कारवाईमुळे शिवसेना डॅमेज होणार नाही. आयटीच्या कारवाईला तोंड देण्यासाठी यशवंत जाधव समर्थ आहेत. मात्र सरकारी यंत्रणा ही दुधारी तलवार असून तिचा वापर तेथून व येथूनही करता येतो, असा सूचक इशाराही महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिला आहे.    

यशवंत जाधव यांच्या घरावर सकाळीच इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकल्याने भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या व भाजपच्या काही लोकांना असुरी आनंद झाला आहे. वास्तविक, इन्कम टॅक्स विभागाचे लोक यशवंत जाधव यांच्या घरी पाहणीला आले आहेत. मात्र भाजपवाले या धाडीचा मोठा गाजावाजा करीत आहेत, अशी टीकाही महापौरांनी यावेळी केली आहे.     

कायद्याच्या चौकटीत संबंधित यंत्रणेने आपले काम करावे. मात्र शिवसैनिकांनी भावनेच्या भरात काही चुकीचे पाऊल उचलू नये, यासाठी मी त्यांना आवाहन करण्यासाठी येथे आले. तसेच, यशवंत जाधव यांच्या घरावर धाड पडल्यावर शिवसेनेचे नेते कुठे गायब झाले, त्यांची पळापळ झाली असे जे काही आरोप भाजप नेत्यांकडून केले जात आहेत, त्यांना उत्तर देण्यासाठी मी येथे आले आहे. आम्ही कुठे लपून बसलेलो नाही. तुमच्या असल्या भेकड कारवायांना घाबरत नाही. यशवंत जाधव हे भिमपुत्र आहेत. ते कोणालाही घाबरणारे नाहीत. ते तुम्हाला उत्तर द्यायला समर्थ व सक्षम आहेत, असा टोलाही महापौरांनी भाजपला लगावला.   

भाजपाची महाराष्ट्रात, पश्चिम बंगाल आदी राज्यात जेथे सत्ता नाही तेथे ते ईडी, सीबीआय, आयटी आदी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप महापौरांनी यावेळी केला. वास्तविक, भाजपवाले विरोधकांना गुन्हेगार, भ्रष्टाचारी समजतात मात्र स्वतः काय दुधाने धुतलेले आहेत का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.  भाजपचे किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये माझे नाव घेऊन काही आरोप केले होते. भ्रष्टाचाराच्या यादीत माझेही नाव घेतले असून मी ८ गाळे हडप केल्याचे आरोप केले आहेत. मात्र ‘ किरीट भावा’ त्या ८ गाळ्यांबाबत मला काहीच माहिती नाही. तुझ्याकडे ८ गाळे असतील तर मला दे, मी ते गाळे ताब्यात घ्यायला तयार आहे, असेही महापौरांनी म्हटले आहे.    

भाजप, सरकारी यंत्रणा यांना आमच्यावर ज्या काही धाडी घालत आहेत, त्या घाला. मात्र पुढे तपासातून जे काही असेल ते स्पष्ट होईल, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आम्ही कायदा मानतो, संविधान मानतो, त्यामुळे यशवंत जाधव चौकशीसाठी सहकार्य करतील. जे काही असेल ते समोर येईलच, असे महापौरांनी म्हटले आहे.         

यंत्रणा दुधारी तलवार

सरकारी यंत्रणा ही दुधारी तलवार असून तेथून व येथूनही वापरता येते, असा सूचक इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. 

मंत्री छगन भुजबळांचे उदाहरण

राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनाही ईडीने अटक केली होती. तुरुंगात डांबले होते. मात्र त्यांना कायद्याने न्याय मिळाला व क्लिन चिट मिळालीच ना, असे उदाहरण महापौरांनी मिडियासमोर दिले.

शिवसेना डॅमेज होणार नाही 

महाविकास आघाडी सरकार राज्यात चांगले काम करीत आहे. मात्र भाजपला त्याची पोटदुखी होत आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर ईडी, आयटी यांचे धाडसत्र सुरू झाले असले तरी शिवसेनेला डॅमेज करू शकत नाही, असा आत्मविश्वास महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला. 

असुरी आनंद अंगाशी येईल

भाजपवाले आता असुरी आनंद व्यक्त करीत असले तरी तो त्यांच्या अंगाशी येणार आहे, असा इशाराही महापौरांनी दिला आहे. तसेच, भाजपवाले गेली २० वर्षे आमच्या सोबत सत्तेत होते. पालिकेच्या सुधार समिती, शिक्षण समिती, बेस्ट समिती अध्यक्ष पदी भाजपचे नगरसेवक होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here